शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने 6.84 कोटीची फसवणुक

व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून एका व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबियांची 6 कोटी 84 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कफ परेड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेंसा फर्म कंपनीचे मालक शशांक सुनिल सिंघानिया आणि सिद्धांत सुनिल सिंघानिया या दोन बंधूंविरुद्ध कफ परेड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींच्या कंपनीत इतर काही लोकांनी शेअरमध्ये गुंतवणुक केली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

घाटकोपर येथील रहिवाशी असलेले पारस विनोदचंद्र कोठारी हे व्यावसायिक आहेत. त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत त्यांची शशांक सिंघानिया आणि सिद्धांत सिंघानिया यांच्याशी ओळख झाली होती. त्यांची सेंसा फर्म नावाची एक कंपनी होती. ही कंपनीत शेअर ट्रेडिंगचे काम करते. या दोघांनी त्यांना स्टॉक मार्केटमध्ये विशेष प्राविण्य आहे अशी बतावणी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना तसेच इतर नातेवाईकांना त्यांच्या कंपनीमार्फत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते.

त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी सेंसा फर्मच्या बँक खात्यात शेअर गुंतवणुकीसाठी 9 कोटी 85 लाखांची रक्कम ट्रान्स्फर केली होती. हा संपूर्ण व्यवहार फेब्रुवारी 2024 ते जून 2025 या कालावधीत झाला होता. या गुंतवणुकीवर सिंघानिया यांनी त्यांना तीन कोटीचा परतावा दिला होता. मात्र उर्वरित 6 कोटी 84 रुपयांच्या गुंतवणुकीवर कुठलाही परतावा दिला नाही. तसेच मूळ रक्कमही परत केली नाही. वारंवार विचारणा करुनही या दोघांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शशांक सिघांनिया आणि सिद्धांत सिंघानिया यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन 6 कोटी 84 लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी 25 जूनला संबंधित दोन्ही आरोपीविरुद्ध कफ परेड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शशांक आणि सिद्धांत हे दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page