शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने वयोवृद्धासह दोघांची फसवणुक
१३.६८ लाखांची फसवणुक; दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२४
मुंबई, – शेअरमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाने एका वयोवृद्धासह दोघांची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे १३ लाख ६८ हजाराची फसवणुक केली. याप्रकरणी पार्कसाईट आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे नोंदवून तपास सुरु केला आहे. यातील दोन बोगस कंपनीविरुद्ध फसवणुकीच्या अनेक तक्रारी असून या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
मार्क गोम्स (५३) हे मालाड येथे राहत असून त्यांचा साऊंड सर्व्हिस भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. ३ जुलैला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना शेअरसंदर्भातील अपडेट माहिती दिसून आली. त्यानंतर त्यांना एका व्हॉअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. या ग्रुपमधील अनेक सभासदांनी शेअरमध्ये गुंतवणुक केली होती, या गुंतवणुकीवर त्यांना चांगला नफा मिळत होता. त्यामुळे ऍडमिनने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना दहा ते शंभर टक्के परताा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ३ जुलै ते ५ जुलै २०२४ या दोन दिवसांत विविध कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे नऊ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला नफा झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे शेअर विकण्याची विनंती करुन ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. या शेअर विक्रीतून त्यांना १० हजार ५८ हजार रुपये मिळणे अपेक्षित केले. मात्र ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली नाही. त्यामुळे कंपनीच्या प्रभादेवी येथील कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी कंपनीने संबंधित फ्रॉड कंपनी असून या कंपनीने शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने आतापर्यंत अनेकांना गंडा घातला आहे. या फ्रॉड कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल असून या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु असल्याचे समजले. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी १९३० या सायबर पोर्टल हेल्पलाईनसह मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत उमेश जनार्दन आचार्य या ६३ वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने ४ लाख ६८ हजाराची फसवणुक केली. उमेश हे विक्रोळी परिसरात राहत असून ते एका खाजगी कंपनीत निवृत्त झाले आहेत. ८ जून ते ६ जुलै २०२४ या कालावधीत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने तो एका खाजगी कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल केले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कंपनीच्या शेअरमध्ये चांगला परतावा मिळवनू देण्याचे आमिष दाखवून ४ लाख ६८ हजार रुपयांची गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. मात्र कुठलाही परवाता न देता त्यांनी गुंतवणुक केलेल्या केलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या दोन्ही तक्रार अर्जानंतर मालाड आणि पार्कसाईट पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.