शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने दहा कोटीची ऑनलाईन फसवणुक

दहा अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका नामांकित कंपनीतून निवृत्त झालेल्या एका 65 वर्षांच्या वकिलासह सल्लागार वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे दहा कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी दहा अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली आहे, त्या सर्व बँक खात्याचा तपशीलसह बँक खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या गुन्ह्यांत संबंधित आरोपींवर लवकरच अटकेची कारवाई केली जणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

65 वर्षाचे तक्रारदार धनश्याम मच्छिंद्र म्हात्रे हे वकिलासह सल्लागार म्हणून काम करत असून सध्या मुलुंड परिसरात राहतात. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीतील धनश्याम हे हेड अ‍ॅडमिन अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिलेशन या पदावरुन निवृत्त झाले होते. सध्या ते वकिलीचा व्यवसायासह विविध नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून काम करतात. जून महिन्यांत त्यांना सुमन गुप्ता नावाच्या एका महिलेने व्हॉटअप कॉल करुन ती एका खाजगी कंपनीत अ‍ॅडमीन म्हणून काम करत असल्याची ओळख सांगितली होती. तिने त्यांना तिच्या कंपनीची माहिती जाणून घेण्यासाठी एक अ‍ॅप पाठवून त्यांना त्यांची माहिती अपलोड करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी तिच्या कंपनीचे अ‍ॅप ओपन करुन त्यात त्यांची वैयक्तिक माहिती अपलोड केली होती. यावेळी त्यांना ही कंपनी शेअर ट्रेडिंगशी संबंधित असल्याचे दिसून आले होते. त्यात प्रत्येक सभासद त्यांच्या शेअरसंबंधित माहिती देताना त्यात होणार्‍या प्रॉफिटची माहिती शेअर करत होते.

काही दिवसांनी तिने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. यावेळी तिच्यासोबत इतर आठ ते नऊजणांनी त्यांना संपर्क साधून प्रत्येक शेअरची माहिती देताना कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल याची माहिती दिली होती. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी जून ते सप्टेबर 2025 या कालावधीत या कंपनीच्या मार्फत विविध शेअरमध्ये 9 कोटी 94 लाख 76 हजार 958 रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड प्रॉफिट झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वारंवार प्रयत्नही त्यांना ती रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता आली नाही. त्यामुळे त्यांनी ग्रुप अ‍ॅडमिनकडे विचारणा केली होती,

मात्र ते सर्वजण त्यांना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. ते त्यांना आणखीन गुंतवणुकीचा सल्ला देत होते. त्यांनी आधीच घरासह जागेची विक्री करुन शेअरमध्ये गुंतवणुक केली होती, त्यामुळे त्यांना आणखीन गुंतवणुक करणे शक्य नव्हते. ही बाब सांगूनही ते त्यांच्याकडे विविध टॅक्ससह कमिशनची मागणी करत होते. नंतर त्यांनी त्यांना प्रतिसाद बंद केले, संबंधित सायबर ठगांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. त्यामुळे ते मालाड येथील संबंधित कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र तिथे त्यांना सुमन गुप्ता, सुरेश मल्होत्रा नावाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी काम करत नसल्याचे निदर्शनास आले.

शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सुमनसह इतर नऊजणांनी त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलसह एनसीसीआर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित दहाजणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page