मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 नोव्हेंबर 2025
मुंबई, – चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यक्तीची अज्ञात सायबर ठगाने सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बोगस कंपनीसह व्हॉटअप ग्रुपच्या अॅडमिन असलेल्या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर विभागाने फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुमीत ओमप्रकाश अग्रवाल हे 51 वर्षाचे तक्रारदार अंधेरीतील चांदीवली परिसरात राहतात. प्रभादेवीतील एका खाजगी कंपनीतून ते निवृत्त झाले असून सध्य घरी असतात. 20 नोव्हेंबरला ते फेसबुक पाहत असताना त्यांना आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट नावाचे एक फेसबुक खाते दिसले. त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते.
या ग्रुपमधील अॅडमीन यतीन शाहने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी ग्रुपमधील इतर सभासदांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेकांनी शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे तसेच त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा झाल्याचे दिसून आले. त्यामुुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ग्रुप अॅडमिनसह इतरांच्या सांगण्यावरुन त्यांनी वेगवेगळ्य शेअरमध्ये दहा लाखांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी यतीन शाहकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांचा क्रेडिट स्कोर कमी आहे. त्यामुळे त्यांना आणखीन शेअरमध्ये गुंतवणुक करावे लागेल असे सांगितले, मात्र त्यांनी शेअरमध्ये आणखीन गुंतवणुक करण्यास स्पष्टपे नकार दिला होता. यावेळी यतीनने त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार नाही असे सांगून त्यांचा कॉल ब्लॉक केला होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसांसह पश्चिम सायबर प्रादेशिक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संंबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.