तेरा कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
चांगला परताव्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – सुमारे तेरा कोटीच्या फसवणुकीप्रकरणी एका पती-पत्नीविरुद्ध खार पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि बेकायदेशीर ठेवी योजना कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक बहादूर सिंग आणि उमा बहादूर सिंग अशी या दोघांची नावे असून ते दोघेही ग्रे 8 ट्रेडिंग कंपनीचे संचालक आहेत. या दोघांनी अनेकांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अंकुर जितेंद्र महाजन हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटु्रंबियांसोबत अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहतात. त्यांचा ट्रकच्या स्पेअरपार्टचा व्यवसाय असून ग्रॅटरोड येथे त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची एका कॉमन मित्रामार्फत अभिषेक सिंगशी ओळख झाली होती. त्याचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. या गुंतवणुकीवर त्याने अनेकांना चांगला परतावा दिला आहे असे सांगून त्याच्या कंपनीमार्फत शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. याच दरम्यान त्यांची अभिषेकशी अंधेरीतील एका कॅफे शॉपमध्ये भेट झाली होती. यावेळी त्याने त्यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना दोन ते चार आठवड्यात चाळीस टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.
त्याने त्याची ग्रे 8 ट्रेडिंग नावाची कंपनी असून या कंपनीत त्याच्यासह त्याची पत्नी उमा सिंग हे संचालक असल्याचे सांगितले होते. या भेटीनंतर अभिषेक त्यांना सतत कॉल करुन गुंतवणुकीबाबत विचारणा करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या कंपनीमार्फत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांच्यात एक कॉपरेटीव्ह इन्वहेसमेंट करार झाला होता. त्यात अंकुश महाजन हे त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमध्ये गुंतवणुक करतील. या गुंतवणुकीवर त्यांना सहा ते सात आठवड्यात 40 ते 50 टक्के परतावा दिला जाईल. या कराराची मुदत 10 जुलै 2024 पर्यंत राहिल असे नमूद करण्यात आले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांनी 28 मे ते 3 जून 2024 या कालावधीत विविध शेअरमध्ये 66 लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी परताव्याची रक्कम दिली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. घरी गेल्यानंतर अभिषेक आणि उमा हे दोघेही घर सोडून गेल्याचे समजले. चौकशीअंती अभिषेक आणि उमा यांनी अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते, मात्र कोणालाही मूळ रक्कमेसह परतावा दिला नव्हता. त्याच्या कंपनीत अनेकांनी सुमारे तेरा कोटीची गुंतवणुक केली होती, या गुंतवणुकीनंतर ते दोघेही पती-पत्नी फरार झाले होते.
हा प्रकार उघडकीस येताच अंकुर महाजन यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अभिषेक सिंग आणि उमा सिंग या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राथमिक तपासात ही फसवणुक तेरा कोटीची असली तरी हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.