शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्धाची फसवणुक
७७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून एका ७७ वर्षीय वयोवृद्धाची त्याच्याच परिचित आरोपीने सुमारे ७७ लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी जय मुकेश मेहता या आरोपीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. जय मेहताने अशाच प्रकारे इतर काही लोकांना चांगला परताव्याच्या आमिषाने गंडा घातल्याचे बोलले जाते.
दिनेशचंद्र न्यायचंद भरवाडा हे व्यावसायिक असून ते बोरिवलीतील चंदावरकर रोडवरील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहतात. दोन वर्षांपूर्वी मिरारोडचा रहिवाशी असलेला जयसोबत त्यांची ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने त्याचा शेअरमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. शेअरमध्ये त्याने अनेकांचे पैसे गुंतवणुक केले असून त्यांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुक करावी. त्यांचा वार्षिक दहा टक्के फायदा मिळवून देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. जय हा त्यांच्या परिचित तसेच चांगला मित्र झाल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी एक कोटी रुपये दिले होते. या गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना २२ लाख ५५ हजार रुपये व्याज म्हणून दिले होते. मात्र नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर जय मेहता त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने जयने एक कोटी रुपये घेऊन त्यांना २२ लाख ५५ हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित ७७ लाख ४५ हजाराचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर गुरुवारी २२ ऑगस्टला जय मेहताविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.