शेअर विक्रीच्या नावाने रियल इस्टेट व्यावसायिकाची फसवणुक

19 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पुण्यातील ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – शेअर विक्री करत असल्याचे भासवून सुमारे 19 लाख रुपये घेऊन शेअर न पाठविता एका रियल इस्टेट व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आलाद आहे. याप्रकरणी प्रशांत डाकले या पुण्याच्या ठगाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. प्रशांत हा पुण्याचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच पुण्याला जाणार आहे.

नवीन रामचंद्र उपाध्याय हे विलेपार्ले येथे राहत असून त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. भागचंद्र महेश्वरी हे त्यांचे मित्र असून ते दोघेही गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांचा प्रशांत डाकले हा मित्र असून त्यांनीच त्याची त्यांच्याशी ओळख करुन दिली होती. यावेळी प्रशांतने त्यांच्याकडे एका खाजगी कंपनीचे शेअर असून या शेअरला चांगला भाव असल्याचे सांगितले होते. त्यांच्याकडे 1 लाख 94 हजार 700 शेअर शेअर असून एक शेअरची किंमत दहा रुपये असल्याचे सांगितले.

या शेअर खरेदीसाठी नवीन उपाध्याय इच्छुक असल्याने त्यांनी त्याला संबंधित शेअर विक्री करण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी त्याला 19 लाख 70 हजार 700 रुपये ट्रान्स्फर केले होते. यावेळी प्रशांतने डिमॅट खात्यातून संबंधित शेअर दहा ते पंधरा दिवसांत पाठविण्याचे आश्वासन दिले, मात्र एक महिना उलटूनही त्याने त्यांना शेअर ट्रान्स्फर केले नाही.

त्यांनी त्याला कॉल केला असता त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्राकडे विचारणा केली होती. मात्र त्याचाही कॉल प्रशांतने घेतला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नोकराला प्रशांतच्या पुण्यातील शिवाजीनगर, शिवाजी सहकारी सोसायटीच्या रोहन गरीमा, एस. 103, ए/10/11 या फ्लॅटवर पाठविले होते. मात्र त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. शेअर विक्रीच्या नावाने प्रशांतने त्यांच्याकडून 19 लाख 70 हजार 700 रुपये घेऊन शेअर न पाठविता त्यांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात प्रशांतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शेअर विक्रीच्या बहाण्याने प्रशांतने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page