अनलिस्टेड शेअर खरेदी विक्री व्यवहारात 13 कोटींची फसवणुक
व्यावसायिक तरुणाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – अनलिस्टेड शेअर खरेदी विक्रीच्या व्यवहारात एका शेअर सल्लागार व्यावसायिकाची त्याच्याच परिचित व्यावसायिक तरुणाने 13 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार फोर्ट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हित भावेश शहा या 21 वर्षांच्या व्यावसायिक तरुणाविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
हरिश नगीनदास कंपानी हे 59 वर्षांचे तक्रारदार अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून शेअर सल्लागार म्हणून काम करतात. त्यांची एच. नगीनदास छगनलाल नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीचे कार्यालय फोर्ट येथील दलाल स्ट्रिट, पी. जी टॉवरमध्ये आहे. ही कंपनी अनलिस्टेड शेअर ब्रोकिंग, जुने शेअरचे नवीन डी मॅट स्वरुपात बदली करण्याचे काम करते. हित शहा हा तरुण याच परिसरात राहत असून त्यांच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये त्याचे एक कार्यालय आहे. तो अनलिस्टेट शेअर ब्रोकिंगचे काम करत होता. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते.
काही दिवसांपूर्वी त्यांना हितने त्याच्याकडे नॅशनल स्ट्रॉक एक्सचेंजचे काही अनलिस्टेड शेअर असून त्याला या शेअरची विक्री करायची आहे असे सांगितले होते. त्यांना त्यांच्या ग्राहकांसाठी अनलिस्टेड शेअरची गरज होती, त्यामुळे जून 2025 रोजी त्यांनी हित शहाला संपर्क साधून त्याच्याकडे एक लाख रुपयांचे एनएसईच्या अनलिस्टेड शेअरची मागणी केली होती. त्यापैकी 13 हजार 700 शेअर त्यांच्या ग्राहकांसाठी तसेच 6 हजार 300 शेअर स्वतसाठी हवे होते. त्याने एक लाख शेअर देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याकडे 21 कोटी 80 लाख मागणी केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. काही दिवसांनी त्याने त्यांना काही शेअर ट्रान्स्फर केले,
मात्र उर्वरित शेअरची वारंवार मागणी करुनही त्याने त्यांना शेअर पाठविले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे शेअरसाठी घेतलेल्या पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्याने त्यांना 11 कोटी 42 लाख 50 हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम परत केली नाही किंवा शेअर पाठविले नव्हते. सप्टेंबर 2025 त्याने त्यांना कॉल करुन त्याच्याकडे विविध कंपन्यासाठी निधी उपलब्ध करण्याची दलालीचे काम मिळाले आहे. त्यातून त्याला मोठी दलालीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तो त्यांना लवकरच त्यांची उर्वरित रक्कम परत करणार असल्याचे सांगितले.
3 सप्टेंबर 2025 रोजी 70 लाख रुपयांचे एनएसईचे 25 हजार अनलिस्टेड शेअर दिले होते. अशा प्रकारे वारंवार मागणी करुन त्याने अनलिस्टेड शेअर देण्याची बतावणी करुन त्यासाठी घेतलेल्या तेरा कोटी सतरा लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम परत न करता, शेअर ट्रान्फर न करता त्यांची फसवणुक केली होती. हित शहाकडून पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध अनलिस्टेड शेअरसाठी घेतलेल्या तेरा कोटी सतरा लाख पन्नास हजाराचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.