शेअरमार्केट गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने गंडा
६६ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी संचालकासह इतराविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शेअरमार्केट गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून पंधराहून अधिक गुंतवणुकदरांची ६६ लाख ५० हजाराची फसवणुक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोधी इंटरप्रायजेसचे तीन संचालक भिमसेन सुनिल भालेराव, चित्रसेन सुनिल भालेराव, नेहा भिमसेन भालेराव यांच्यासह अधिकारी आणि एजंटविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी भादवीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत पंधराहून अधिक गुंतवणुकदारांनी पोलिसांत तक्रार केली असली तरी आणखीन बर्याच गुंतवणुकदारांनी कंपनीत पैसे गुंतवले आहेत, त्यामुळे फसणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५५ वर्षांची लक्ष्मी संजय पारधे ही समाजसेविकासह प्रॉपटी एजंट म्हणून काम करत असून तिच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहते. मे २०२२ रोजी तिची मैत्रिण वैशाली म्हस्के हिने तिला तिच्या नात्यातील भाऊ भिमसेनशी ओळख करुन दिली होती. या भेटीत भिमसेनने त्याची औरंगाबाद येथील आंबेडकनगर, सिडको लाईन क्रमांक सहामध्ये बोधी इंटरप्रायजेस नावाची एक कंपनी असून ही कंपनीत शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय करते.या कंपनीच्या माध्यमातून अनेकांनी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली असून त्यांना कंपनीने आठ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे तिनेही शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी, त्याची कंपनी तिला चांगला परतावा मिळवून देईल असे आमिष दाखविले होते. याच दरम्यान त्याने तिला इतरांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केल्यास त्यांना गुंतवणुकीवर तीन टक्के कमिशन देण्याचीही ऑफर दिली होती. या दोन्ही ऑफर चांगल्या होत्या. त्यामुळे तिने त्यास होकार दिला होता. तिचा विश्वास बसावा म्हणून भिमसेनने तिच्यासह इतर गुंतवणुकदारासाठी एका सेमिनारचे आयोजन केले होते. त्यात भिमसेनसह त्याचा भाऊ चित्रसेन, पत्नी नेहा ही उपस्थित होती.
या सेमिनारमध्ये त्यांना शेअरमार्केट गुंतवणुकीवर त्यांना कसा फायदा होईल याबाबतची माहिती देण्यात आली होती. या माहितीने सर्वजण प्रभावित झाले होते. त्यामुळे लक्ष्मी पारधेसह इतरांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे दिले होते. यावेळी त्यांच्यासोबत कंपनीचा एक करार झाला होता. त्यात प्रत्येक महिन्यांच्या तेरा तारखेला नफ्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. अशा प्रकारे मे २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत लक्ष्मीसह जवळपास पंधराहून लोकांनी त्यांच्या कंपनीत ६६ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. करारानुसार जानेवारी आणि ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत सर्वांना गुंतवणुकीवर परतावा मिळाला होता. मात्र नंतर कंपनीने परताव्याची रक्कम देणे बंद केले होते. याबाबत संबंधित गुंतवणुकदारांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी सर्वांचे पैसे जानेवारी २०२४ पर्यंत देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत कोणालाही मूळ व परताव्याची रक्कम दिली नाही. नंतर कंपनीच्या तिन्ही संचालकांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. फसवणुकीचसा हा प्रकार उघडकीस येताच या गुंतवणुकदारांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी कंपनीच्या तिन्ही संचालकासह इतर अधिकारी आणि एजंटविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भिमसेन, चित्रसेन, नेहा या तीन संचालकासह इतरांविरुद्ध पोलिसांनी १२० बी, ४०६, ४०९, ४२० भादवी सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच संबंधित आरोपींची पोलिसाकडून चौकशी होणार आहे.