शेअरमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणुक
सायबर ठगांना मदत करणार्या त्रिकुटाला अटक व पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चांगला परताव्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ऑपेरा हाऊस परिसरातील एका व्यावसायिकाची सुमारे ५८ लाखांच्या फसवणुक केल्याप्रकरणी एका त्रिकुटाला दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अजय उन्नी, शैलेश पुरुषोत्तम पटेल आणि अजयकुमार सुखदेव करचे अशी या तिघांची नावे असून ते तिघेही सायबर ठगांना बँक खाती पुरविण्यासह पैसे ट्रान्स्फर करण्यास मदत करत होते. याकामी प्रत्येकाला ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने सोमवार १४ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जयेश बालाचंद शहा हे ऑपेरा हाऊस, फ्रेंच ब्रिज रोड, शांतीसदन अपार्टमेंटमध्ये राहत असून ते व्यवसायाने व्यावसायिक आहेत. मे २०२४ रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ये शेअरमार्केटसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. याच दरम्यान ग्रुप ऍडमिनने त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी २४ मे ते ३० जुलै २०२४ या कालावधीत विविध शेअरसाठी ५८ लाख ४९ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत मूळ रक्कमेसह कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमाार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० बी, ३४ भादवी सहकलम ६६ सी, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक जाधव व अन्य पोलीस पथकाने तांत्रिक माहितीवरुन शुक्रवारी जयेश उन्नी या ३४ वर्षांच्या आरोपीस अटक केली होती. जयेश हा नवी मुंबईतील कौपरखैरणेचा रहिवाशी आहे. त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीपैकी पाच लाख रुपयांची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्याने काढून वापरल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याच्या चौकशीतून इतर दोघांची नावे समोर आले होते. त्यानंतर शनिवारी या पथकाने शैलेश पटेल आणि अजयकुमार करचे या दोघांना अटक केली. ते दोघेही नवी मुंबईतील रहिवाशी आहे. या दोघांनाही जयेशने काही रक्कम बँकेतून काढून दिली होती. त्यानंतर या दोघांनी ती रक्कम सायबर ठगांना दिली होती. याकामी या तिघांनाही ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. ते तिघेही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना विविध बँकेत खाते उघडून, या खात्यात जमा होणारी रक्कम सायबर ठगांना देत असल्याचे उघडकीस आले आहे.