शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने महिलेची २९ लाखांची फसवणुक
वांद्रे येथील घटना; फसवणुकीप्रकरणी वयोवृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून एका ४६ वर्षांच्या महिलेची तिच्याच परिचित वयोवृद्धाने सुमारे २९ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिग्नेश भरतभाई शहा या वयोवृद्ध आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जिग्नेशला यापूर्वीही फसवणुकीच्या एका गुन्ह्यांत अटक झाली असून याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर होता. आता त्याच्याविरुद्ध दुसर्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
मानसी अशोक कुलकर्णी ही महिला तिच्या वयोवृद्ध आई आणि आजीसोबत वांद्रे येथे राहत असून योगाचे शिकवणी घेते. तिचे परिचित संजय देशपांडे असून ते वांद्रे येथील पारीजात अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या घरी संत्संग चालत असल्याने ती गेल्या गेल्या चौदा वर्षांपासून त्यांच्या घरी जात होती. तिथेच तिची ६५ वर्षांचे वयोवृद्ध जिग्नेशशी ओळख झाली होती. जिग्नेश हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे काम करतो. त्याच्याकडे गुंतवणुक केल्यास तिला चांगला फायदा होईल असे संजय देशपांडे यांनी सांगितले होते. त्यात जिग्नेशने त्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत असून त्याने आतापर्यंत अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन चांगला परतावा मिळवून दिला आहे. त्याने तिला तिच्या नावाने शेअर खरेदी करुन तिच्या डिमॅट खात्यात शेअर ट्रान्स्फर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेत जून २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत जिग्नेशला शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी २९ लाख ३१ हजार रुपये दिले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर तो तिला कोणते शेअर खरेदी केले आहे, तिला शेअरमध्ये किती रुपयांचा फायदा झाला याबाबत नियमित माहिती देत होता. त्याने पाठविलेल्या स्टेटमेंटवरुन तिच्या शेअरचा भाव प्रचंड वाढल्याचे दिसून आले होते. २०१८ साली तिने शेअरमध्ये गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी केली होती, मात्र त्याने तिला पैसे दिले नाही.
याच दरम्यान तिला जिग्नेशला फसवणुकीच्या एका गुन्ह्यांत वांद्रे पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. काही महिन्यानंतर त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने त्याच्याकडे पुन्हा पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या सहा वर्षांत त्याने तिला गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम दिली नाही. तिच्या नावाने कोणतेही शेअर खरेदी केले. डिमॅट खात्यात शेअर ट्रान्स्फर न करता शेअर गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने जिग्नेशविरुद्ध वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जिग्नेशविरुद्ध अन्य एका अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.