शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने वयोवृद्ध महिलेची फसवणुक

२५ लाखांना गंडा घालणार्‍या वॉण्टेड आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ जून २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका वयोवृद्ध महिलेची सुमारे २५ लाखांची फसवणुक करणार्‍या एका वॉण्टेड आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. राजीव बलदेवराज अदलाखा असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजीवने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

हेमलता ऐबिनिजर पिटरर्स ही ६३ वर्षांची वयोवृद्ध महिला तिची मोठी बहिण भारती हिच्यासोबत मालाडच्या एव्हरशाईन नगरात राहते. त्यांचा पूर्वी दुबई येथे ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता, मात्र तो व्यवसाय बंद करुन त्या दोघीही मुंबईत परत आल्या होत्या. त्यातून मिळालेल्या पैशांनी त्यांनी म्युचल फंडात काही रक्कम गुंतवणुक केली होती. दुबईला वास्तव्यास असताना त्यांनी २०१९ रोजी मुंबई शहरात फ्लॅट घेण्यासाठी दुबईतील इंडिया बुल्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. यावेळी तिची कंपनीचा मॅनेजर राजीव अदलाखाशी ओळख झाली होती. राजीवने तो शेअरमार्केटमध्ये काम असल्याचे सांगून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना दरमाह दोन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्याला २० मार्च २०१९ रोजी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी २५ लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याच्या बँक खात्यात नेट बँकिंगच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्यात आली होती. त्यानंतर राजीवने तिला एका खाजगी बँकेचा २५ लाखांचा सिक्युरिटी धनादेश दिला होता. चार ते पाच महिने त्याने गुंतवणुकीवर दोन टक्क्याप्रमाणे व्याजाची रक्कम दिली, मात्र नंतर त्याने ही रक्कम देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर राजीव हा शेअर मार्केट सध्या डाऊन आहे. त्यामुळे पैसे पाठवता आले नाही, मात्र लवकरच सर्व रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करतो असे सांगत होता.

मात्र दोन वर्ष उलटूनही त्याने व्याजासह मुद्दल रक्कम दिली नाही. त्यामुळे त्या दोघीही मे २०२१ रोजी दुबईतील इंडिया बुल्स कंपनीत राजीवला भेटण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना राजीवला कंपनीने कामावरुन काढून टाकले आहे. त्यानंतर तो त्याच्या दिल्लीतील घरी निघून गेल्याचे समजले होते. ऑक्टोंबर २०२१ त्या दोघीही बहिणी दुबईहून मुंबईत आल्या होत्या. त्यांनी पुन्हा राजीवला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याने दिलेला सिक्युरिटी धनादेश तिने बँकेत टाकला होता, मात्र तो धनादेश बँकेत न वटता परत आला होता. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर चांगला परताबा देतो असे सांगून राजीवने तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राजीवविरुद्ध पोलिसांनी ४२० भादवी सहकलम ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वॉण्टेड असलेल्या राजीवला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याने हेमलता यांच्यासह इतर काही लोकांना शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page