शेअरमार्केट गुंतवणुकीसाठी घेतलेल्या १९ लाखांचा अपहार
सहाजणांविरुद्ध गुन्हा; सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे गाजर दाखवून एका २९ वर्षीय तरुणाला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक प्रवृत्त करुन सुमारे १९ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा सायबर ठगाविरुद्ध उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सायबर सेलकडून जनजागृती करुन संबंधित व्यक्ती अशा सायबर ठगांच्या जाळ्यात सापडून स्वतचे नुकसान करुन घेत आहेत.
रामजी कानजी वाविया हा तरुण कांदिवलीतील लोखंडवाला परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. एप्रिल महिन्यांत त्याने सोशल मिडीयावर शेअरसंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. ही जाहिरात ओपन केल्यानंतर त्याला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये विविध शेअरसह गुंतवणुकीबाबत माहिती दिली जात होती. ग्रुपमधील लोकांनी जास्तीत जास्त शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात होते. कुठल्या शेअर खरेदीवर त्यांना किती फायदा होईल याची माहिती देऊन त्यांना चांगला परताव्याचे गाजर दाखविले जात होते. याच आमिषाला बळी पडून या रामजीने विविध शेअरमध्ये सुमारे १९ लाखांची गुंतवणुक केली होती. त्यापूर्वी त्याच्याकडून एक फॉर्म भरुन घेण्यात आला होता. त्यात त्याच्या वैयक्तिक माहितीसह पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड तसेच बँक खात्याशी संबंधित घेण्यात आली होती. काही दिवसांनी त्याला दुसरा आयपीओ घ्यावा लागेल असे सांगून आणखीन साडेनऊ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले होते.
मात्र पैसे नसल्याने त्याने ती रक्कम भरण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी त्यांचे शेअर विक्री करुन पैसे घ्या असे सांगितले. मात्र या शेअर विक्रीतून आलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. या पैशांसाठी त्यांना वीस टक्के टॅक्स भरावे लागणार असल्याचे सांगून पैसे भरले नाहीतर त्यांना ही रक्कम मिळणार नाही असे ऍडमिनने सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.