शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २३ लाखांची फसवणुक
निवृत्त शिक्षिकेची फसवणुक करणार्या ठगाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून एका ५४ वर्षांच्या निवृत्त शिक्षिकेची सुमारे २३ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी शिवम नरेंद्र वर्मा या ठगाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. शिवमने ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप असून त्यासाठी त्याला २५ हजार रुपयांचे कमिशन मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत इतर पाचजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला ही गोरेगाव येथील अरुणकुमार वैद्य मार्ग, नागरी निवारा परिषद परिसरात राहत असून ती शिक्षिका म्हणून निवृत्त झाली आहे. मे महिन्यांत तिला गुगलवर शेअरमार्केटसंदर्भातील अंकुर केडिया यांची जाहिरात दिसली होती. या जाहिरातीवरील लिंक ओपन केल्यानंतर तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये इतर अनेक सभासद होते. ग्रुपमध्ये शेअरमार्केटमधील दररोज घडणार्या घडामोडीची माहिती देण्यात आली होती. त्यातून तिला अनेक सभासदांनी शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली असून या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रुपच्या ऍडमिनने तिला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना तिला चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून तिने १२ मे ते ४ जुलै २०२४ या कालावधीत २३ लाख ६९ हजार ९९८ रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीला तिला चांगला फायदा होत असल्याचे भासविण्यात आले होते. त्यामुळे तिने काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला यश आले नाही.
याबाबत ग्रुप ऍडमिनकडे विचारणा केल्यानंतर त्याने तिला आणखीन काही पैसे गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मात्र तिने पैसे भरण्यास नकार देत तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी तिला प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध ६१ (२), ३१८ (३), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (क), ६६ (क) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकातील किरण आहेर, वसईकर, सय्यद व अन्य पोलीस पथकाने शिवम वर्मा याला मिरारोड येथून ताब्यात घेतले होते.
तपासात शिवम हा मिरारोडच्या शांती गार्डन, शांती गार्डन, सेक्टर चार, ४०३/४०४ बिल्डींग क्रमांक तीनचा रहिवाशी आहे. तो ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविण्याचे काम करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याची बारमध्ये एका आरोपीशी ओळख झाली होती. या आरोपीने त्याला बँक खाती पुरविल्यास त्याला चांगले कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. झटपट पैशांसाठी त्याने एका बँकेत खाते उघडून या खात्याची माहिती आरोपीला दिली होती. त्यासाठी त्याला आरोपीने २५ हजार रुपये दिले होते. तक्रारदार महिलेची फसवणुकीची काही रक्कम याच बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीतून इतर चार ते पाच आरोपींचे नाव समोर आले आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.