मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून एका तरुणासह त्याच्या परिचित मित्रांसह नातेवाईकांची चारजणांच्या टोळीने सुमारे तीन कोटीची फसवणुक केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध कट रचून बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. किरण चव्हाण, किशोर चव्हाण, जितेश मालवणकर आणि मयुरी भोगले अशी या चौघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत आतापर्यंत वीस तक्रारार पुढे असून या टोळीने आणखीन 60 ते 75 लोकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
विशाल अमृतलाल कुमावत हा 27 वर्षांचा तरुण जोगेश्वरी परिसरात राहत असून तो झव्हेरी बाजार येथील एका ज्वेलर्स दुकानात कामाला आहे. वैभव बाबर हा त्याचा कॉलेजपासूनचा मित्र आहे. दोन वर्षांपूर्वी तो त्याच्याकडे आला होता. यावेळी त्याने त्याला आर्थिक गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. त्याने किरण चव्हाण आणि जितेश मालवणकर यांना शेअरमार्केटमध्ये प्रचंड माहिती असून त्यांच्याकडे सेबी रजिस्टर परवानगी आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकांचे पैसे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केले असून त्यांना चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते दोघेही त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी किरण चव्हाण, जितेश मालवणकर यांच्यासोबत त्यांची किशोर चव्हाण आणि मयुरी भोगले यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी त्यांनी शेअरमार्केटमधील गुंतवणुकीची सविस्तर माहिती सांगून त्यांना काही दिवसांत गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून काही रक्कम गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत होता. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचा विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी या गुंतवणुकीबाबत त्यांच्या कुटुंबासह इतर नातेवाईक, मित्रमंडळींना माहिती दिली होती. त्यांना आलेला अनुभव पाहता त्यांनीही त्यांच्याकडे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांच्याकडे विशाल कुमावतने 45 लाख, संजय एकनाथ गायकवाडने पाच लाख, वैभव बाबरने अठरा लाख, अनिकेत प्रभाकर मेस्त्रीने साडेसात लाख, संदेश दत्ताराम माळकरने सोळा लाख, रोहित अशोक जिन्जेने साडेतीन लाख, विश्वनाथ लक्ष्मण मेस्त्रीने 61 लाख 15 हजार, वैशाली पंड्याने पाच लाख, अंबिका राजू केशरवाणीने साडेचार लाख, प्रविण प्रकाश देवळेकर व सुभांगी प्रविण देवळेकरने सोळा लाख चाळीस हजार, अशोक रामभाऊ चौरसियाने पंधरा लाख, हुसैनअली तेहरअली मुकदमने पंचवीस लाख, चारुदत्ता चिंतामण दवणेने दहा लाख, अनुप सुरेश पाताडेने अकरा लाख, लक्ष्मी पुंडलिक सूर्यवंशीने सात लाख, कुशाल सुनिल हंबीरेने तीन लाख चाळीस हजार, अनिल कसुरडेने अडीच लाख, स्नेहा अबनावेने साडेपाच लाख, रॉबीन रामभाऊ चौरसियाने तीस लाख तर कलाबेन सेवंतीलाल शहा हिने सोळा लाख असे वीसजणांनी तीन कोटी सात लाख पंच्चेचाळीस हजाराची गुंतवणुक केली होती.
त्यांची रक्कम वेगवेगळ्या योजनेतंतर्गत गुंतवणुक करण्यात आल्याचे सांगून त्यांना गुंतवणुकीवर बारा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या गुंतवणुकीवर त्यांना काही महिने परतावा मिळाला. मात्र नंतर त्यांनी परतावा देणे बंद केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरोपींच्या कार्यालयासह घरी धाव घेतली होती. यावेळी त्यांना चारही आरोपी त्यांचे मोबाईल बंद करुन पळून गेल्याचे लक्षात आले होते. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे असलेले सेबीचे प्रमाणपत्रही बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी मेघवाडी पोलिसांत धाव घेऊन या चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर किरण चव्हाण, किशोर चव्हाण, जितेश मालवणकर आणि मयुरी भोगले यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात किरणचे वडिल किशोर चव्हाण या संपूर्ण कटाचे मास्तरमाईंड आहे. या टोळीने इतर 60 ते 75 लोकांना अशाच प्रकारे चांगला परतावा देतो असे सांगून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आरोपींकडून फसवणुक झालेल्या तक्रारदारांनी मेघवाडी पोलिसांत तक्रार करावी असे आवाहन आता पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरमयान चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.