गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची साडेचार कोटीची फसवणुक
अंधेरीतून आरोपीस अटक तर मुख्य आरोपीच्या अटकेसाठी जयपूरला टिम रवाना
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे साडेचार कोटीची फसवणुक केल्याच्या कटातील अन्य एका आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सुखबिरसिंग अमरजीतसिंग सुरी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. यापूर्वी निलेश तुकाराम जाधव याला पोलिसांनी अटक केली होती तर या कटातील मुख्य सूत्रधार मनोजय उपाध्याय हा जयपूर येथे वास्तव्यास असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम जयपूरला गेल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार देत तपास सुरु असल्याचे सांगितले. दुसरीकडे तक्रारदार व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर ४८ तासांत सायबर सेल पथकाने फसवणुकीची सुमारे पावणेचार कोटीची कॅश फ्रिज केली होती.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून गेल्या वर्षी त्यांना सोशल मिडीयावर एक जाहिरात दिसली होती. त्यात शेअर मार्केट गुंतचणुकीवर चांगला परवाता मिळत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली होती. काही वेळानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअर मार्केटबाबत अपडेट दिले जात होते. डिसेंबर २०२३ रोजी त्यांना ग्रुपच्या ऍडमिनने संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गंुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून या व्यक्तीने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना गुंतवणुकीच्या नावाने विविध बँक खात्यात ४ कोटी ५६ लाख ८४ हजार ३५४ रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक झाली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेलसह हेल्पलाईन क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस निरीक्षक किरण जाधव, उपनिरीक्षक रुपाली कुलथे, मंगेश भोर, शिपाई सुचिता आचार्य, मीनल राणे, हवालदार अभिजीत राऊळ यांनी तपासाला करुन ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँक खात्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती प्राप्त होताच या अधिकार्यांनी तातडीने एनसीसीआर पोर्टलवर तक्रार करुन बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून संबंधित बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर बँक अधिकार्यांनी या खात्यातील ३ कोटी ७० लाख ४३ हजार ५१५ रुपयांची कॅश फ्रिज केली होती. त्यानंतर या व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक किरण जाधव व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु करुन निलेश जाधवला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. निलेश हा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद आहे. अशाच एका गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व त्यांच्या पथकाने अंधेरीतील सहकारनगर, एव्हरशाईन सहकारी सोसायटीमध्ये राहणार्या सुखबिरसिंग सुरी याला अटक केली. त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्याने दुसर्या बँक खात्यात वळविली होती. त्याच्या विविध अकाऊंटवर एनसीआरपी पोर्टलवर अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. तो ऑनलाईन फसवणुक करणार्या आरोपींना मदत करण्यासाठी इको कनेक्टद्वारे सायबर ठग सांगतील त्याप्रमाणे पैसे ट्रान्स्फसर करण्याचे काम करत होता. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
तपासादरम्यान या संपूर्ण कटाचा मुख्य आरोपी मनोज उपाध्याय असल्याचे उघडकीस आले होते. मनोज हा मूळचा जयपूरचा रहिवाशी असून त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची ३ कोटी ४१ लाख ५१ हजार रुपयांची ट्रान्स्फर झालीी होती. त्यापैकी १९ लाख ६८ हजाराची रक्कम त्याने सुखबिरसिंग सुरीच्या खात्यात ट्रान्स्फर केली होती. निलेश आणि सुखबिरसिंगच्या अटकेनंतर मनोज हा पळून गेला आहे. मनोजच्या अटकेसाठी सायबर सेल पोलिसांचे एक विशेष पथक जयपूरला रवाना झाले आहे. लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.