शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने वयोवृद्ध महिलेची फसवणुक
अंधेरीतील घटना; फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका शिक्षण संस्थेशी संबंधित वयोवृद्ध महिलेची शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने आठ लाख साठ हजाराची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सर्वेश श्रीवास्तव नाव सांगणार्या सायबर ठगाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
६० वर्षांची वयोवृद्ध महिला अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहत असून तिच्या मालकीची एक शिक्षण संस्था आहे. फेब्रुवारी महिन्यांत सोशल मिडीयावर तिला एका शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करुन जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा याबाबत एक जाहिरात दिसली होती. ती लिंक ओपन केल्यानंतर तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. त्यात तिच्याप्रमाणे इतर काही सभासद होते. ग्रुपमध्ये सर्वेश श्रीवास्तव नावाचा एक व्यक्ती शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना काही नोट्स पाठवत होता. त्यानेच शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन तिला जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्वसान दिले होते. या आमिषाला बळी पडून तिने त्याच्या सांगण्यावरुन विविध शेअरमध्ये काही रक्कमेची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर तिला त्यात फायदा होत असल्याचे दिसत होते. मात्र ही रक्कम तिला काढता येत नव्हती. याबाबत तिने विचारणा केल्यानंतर तिला आणखीन काही रक्कम गुंतवणुकीस सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने शेअरमध्ये आठ लाख साठ हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र तिला कुठलाही परवाता मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे सर्वेश श्रीवास्रवतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सर्वेशविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.