शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून वयोवृद्धाची ३६ लाखांची फसवणुक
चार बोगस कंपन्यांच्या ग्रुप ऍडमिनविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परवाता मिळवून देतो असे सांगून एका वयोवृद्धाची सुमारे ३६ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार बोगस कंपन्यांच्या ग्रुप ऍडमिनविरुद्ध उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.
८५ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार रविंद्र नरेंद्र नाईक हे बोरिवली परिसरात त्यांच्या पत्नीसोबत राहतात. ते महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीतून मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेत तर मुलगी अहमदाबाद येथे राहतात. १८ डिसेंबर २०२३ रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन शेअर ट्रेडिंगसंदर्भात माहिती दिली होती. शेअरमध्ये गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगून त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करुन घेतले होते. या ग्रुपमध्ये त्यांच्यासह इतर काही सभासद होते. त्यात नियमित शेअर ट्रेडिंगसंदर्भातील माहिती शेअर केली जात होती. कुठल्या कंपनीत गुंतवणुक केल्यास किती वेळात किती रुपयांचा परतावा मिळेल याबाबत माहिती सांगून ग्रुपमधील सभासदांना संबंधित कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी ग्रुप ऍडमीनने त्यांना एक ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले होते. ते ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना गुंतवणुक करण्यास सांगण्यात आले. १८ डिसेंबर २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्यांना अशाच प्रकारे इतर तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधून शेअर ट्रेडिंगची माहिती देऊन त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या चारही कर्मचार्यांवर विश्वास ठेवून त्यांनी विविध कंपनीच्या शेअरमध्ये ३६ लाख ७५ हजार ६३० रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना चांगला नफा मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत वारंवार ग्रुपच्या ऍडमीनशी संपर्क साधूनही त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी चारही कंपन्यांच्या गु्रप ऍडमीनविरुद्ध १२० ब, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादवी सहकलम ६६ सी, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या बँक खात्यात गुंतवणुकीच्या नावाने ही रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. लवकरच या गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली जाईल असे एका अधिकार्याने बोलताना सांगितले.