शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 1.62 कोटीची फसवणुक
बोगस कंपनीच्या चार सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगसह गुंतवणुकीच्या नावाखाली एका महिलेची 1 कोटी 62 लाख रुपयांची चार अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन उत्तर प्रादेशिक सायबर सेलने चारही सायबर ठगाविरुद्ध कट रचून फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सायबर ठगांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडले असून याबाबत मुंबई पोलिसाकडून सतत जनजागृती केली जात आहे. तरीही काही सुशिक्षित नागरिक अशा ठगांच्या भुलथापांना बळी पडत असल्याचे उघडकीस आले आहे.
50 वर्षांची शॅरन सांतान मॅस्करेन्स ही महिला कांदिवली परिसरात राहत असून फ्रिलान्स कन्सलटंट म्हणून काम करते. गेल्या दहा वर्षांपासून ती शेअर ट्रेडिंग करत असून तिला त्याचा चांगला अनुभव आहे. 2 फेब्रुवारीला ती सोशल मिडीयावरील मॅसेज पाहत होती. यावेळी तिला शेअर ट्रेडिंगसंदर्भात एक लिंक दिसून आली. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्यात 157 सभासद होते, ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगसह गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले जात होते. जवळपास आठवडाभर तिने ग्रुपमध्ये येणार्या मॅसेजचा अभ्यास केला होता. त्यातील माहितीची शहानिशा करुन सध्या शेअर मार्केटमध्ये काय अपडेट आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. गुगल सर्चदरम्यान ही कंपनीत सेबी रजिस्ट्रर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिला कंपनीविषयी खात्री पटली होती. याच दरम्यान तिला ग्रुप अॅडमिनने शेअर ट्रेडिंगसह गुंतवणुकीसाठी विनंती केली होती.
या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी तिच्याकडून तिची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती घेण्यात आली होती. कंपनीकडून बरेच मॅसेज आल्यानंतर तिने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. 2 फेब्रवारी ते 14 मार्च 2025 या कालावधीत तिने विविध शेअरसाठी 1 कोटी 42 लाखांची गुंतवणुक केली होती. त्यासाठी तिने कर्ज घेतले होते. या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिने काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली नाही. याबाबत तिने ग्रुप अॅडमिनकडे विचारणा केली असता त्याने तिला काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले.
ही रक्कम ट्रान्स्फर होताच तिची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे तिने एकोणीस लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही तिच्या बँक खात्यात तिची रक्कम जमा झाली नव्हती. या घटनेनंतर तिचे ग्रुप अॅडमिनसोबत प्रचंड वाद झाला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कंपनीच्या अधिकृत कार्यालयात कॉल करुन ही माहिती सांगितली. यावेळी कंपनीने तिच्या नावाने कंपनीत कुठलेही अकाऊंट नसल्याचे सांगण्यात आले. तिची सायबर फसवणुक झाल्याचे कंपनीच्या कर्मचार्याने सांगितले.
हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनवर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिने उत्तर प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चार अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली या टोळीने तक्रारदार महिलेची 1 कोटी 62 लाख 47 हजाराची फसवणुक केली होती. ही रक्कम कुठल्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.