मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका 54 वर्षांच्या शिक्षिकेला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन तिची सुमारे 49 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी या ठगांचा शोध सुरु केला आहे.
वर्षा रमेश हेमरजानी ही 54 वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी परिसरात राहत असून शिक्षिका आहे. ती ऑनलाईन ट्यूशन घेत असून त्यातून मिळणार्या उत्पानावर तिच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात ती तिच्या घरी होती. यावेळी तिला कालिया नावाच्या एका महिलेने अशिका स्टॉक ब्रोकर या कंपनीच्या शेअर ट्रेडिंगसंदर्भात एक मॅसेज पाठविला होता. काही दिवसांनी तिने तिला कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड केले होते. त्यात तिला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे तिने शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने तिच्या सांगण्यावरुन टप्याटप्याने शेअरमध्ये 49 लाख 26 हजार 500 रुपयांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर तिला एक कोटीपेक्षा अधिक प्रॉफिट झाल्याचे भासविण्यात आले होते. त्यामुळे त्यापैकी काही रक्कम काढण्यचा प्रयत्न केला होता. मात्र वारंवार प्रयत्न करुनही तिला ती रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता आली नाही. त्यामुळे तिने कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधून तिथे तक्रार केली होती. यावेळी तिला ही रक्कम काढण्यासाठी कमिशन चार्ज नावाने काही रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर तिला तिची रक्कम काढता येईल असे सांगण्यात आले. मात्र तिने कमिशन चार्जची रक्कम भरण्यास नकार देत तिच्या मूळ रक्कमेसह प्रॉफिटची रक्कम परत करण्याची विनंती केलीहोती. मात्र त्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही.
ऑनलाईन फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने सायबर सेलसह ऑनलाईन पोर्टलवर तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सायबर सेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याचा तपशील काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.