शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या १.४० कोटीचा अपहार

माय-लेकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या एक कोटी चाळीस लाखांचा अपहार केल्याप्रकरणी मायलेकाविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक कुलकर्णी आणि रोहिनी कुलकर्णी अशी या दोघांची नावे असून यातील प्रतिकने गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून तक्रारदार व्यावसायिकाची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

४९ वर्षांचे बिनॉय विनोद राजा हे पवईतील हिरानंदानी परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा सलोनचा व्यवसाय आहे. जानेवारी २०२२ रोजी त्यांची प्रतिक कुलकर्णीशी ओळख झाली होती. प्रतिक हा त्यांच्या बँक मॅनेजर निकिता मिश्रा यांचा परिचित असून तिनेच प्रतिकसोबत त्यांची ओळख करुन दिली होती. यावेळी निकिताने प्रतिक हा शेअरमार्केटमध्ये टे्रडिंग करत असून त्याने अनेकांना चांगला फायदा मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. त्यानंतर ते प्रतिकच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्यांना प्रतिकची आई रोहिनी कुलकर्णी हिच्या मालकीची ग्रेस्टोन कन्सल्टींग ऍण्ड प्रॉफिट मार्ट सिक्युरिटीज नावाची एक कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातनू प्रतिक हा अनेकांचे पैसे शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करत असल्याचे समजले होते. याबाबात सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रतिकच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याच्याकडे एक कोटी चाळीस लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे प्रतिकने सांगितले होते. त्यांनी खरेदी केलेल्या शेअरची किंमत तीन कोटी तीस लाख रुपये झाली आहे असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी यापुढे कुठल्याही प्रकारे खरेदी-विक्रीचे ट्रेडिंग करु नये असे सांगितले. तरीही त्याने त्यांना अंधारात ठेवून मोठ्या प्रमाणात शेअरमध्ये ट्रेडिंग केले होते. त्यात झालेल्या परताव्याची रक्कम त्यांना न देता त्याने परस्पर अपहार केला होता.

काही दिवसांनी त्यांनी त्यांची संपूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. मात्र त्याने ही रक्कम ट्रान्स्फर केली नाही. त्याने त्यांना ९० आणि ७० लाखांचे धनादेश दिले, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. वारंवार विचारणा करुनही त्याने गुंतवणुक केलेली मूळ रक्कम आणि नफ्याची रक्कम त्यांना दिली नाही. काही दिवसांनी प्रतिकने त्यांना त्याला शेअरमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना ही रक्कम परत करता येत नाही. मात्र तो लवकरच त्यांची रक्कम परत करणार असल्याचे सांगितले. मात्र त्याने ही रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रतिकसह त्याची आई रोहिनी कुलकर्णी यांच्याविरुद्ध पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांन अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे सांगितले. प्रतिकने चांगला परवाता देतो असे सांगून अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page