शेअर ट्रेडिंगच्या नावाने वयोवृद्धाची 70 लाखांची फसवणुक

अपहारासह फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – सौदी अरेबियाच्या एका ऑईल कंपनीतून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्धाची शेअर ट्रेडिंगच्या नावाने दोन भामट्याने सुमारे सतरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अर्पित निलेश शहा आणि मनिष मलकान या दोन्ही भामट्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

60 वर्षाचे तक्रारदार मेहराज अहमद रियाज खान हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत वांद्रे येथे राहतात. 2016 साली मेहराज हे सौदी अरेबियाच्या केजीओ ऑईल कंपनीतून रेडिओ ऑपरेटर म्हणून निवृत्त झाले आहे. त्यांचे वंदना आणि रोहित गायकवाड यांच्याशी चांगले संबंध असून त्यांचे एकमेकांच्या घरी नेहमीच येणे-जाणे असते. त्यांच्यामार्फत त्यांची अर्पित शहाशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान अर्पितने तो शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करतो. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. गायकवाड कुटुंबिय त्यांच्या परिचित तसेच त्यांच्या शिफारशीमुळे त्यांनी अर्पितच्या मदतीने शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

सुरुवातीला त्यांनी त्याच्याकडे दहा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना पाच टक्क्याप्रमाणे परतावा दिला होता. त्यामुळे त्यांच अर्पितवर विश्वास बसला होता. याच दरम्यान अर्पितने त्यांची ओळख मनिष मलकानशी करुन दिली होती. त्याने त्याची शेअर मार्केट इन्व्हेंस्टमेंट नावाची कंपनी असल्याचे सांगून त्याच्या कंपनीमार्फत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी मनिषच्या कंपनीत चेकद्वारे 53 लाख तर कॅश स्वरुपात सहा लाख रुपये असे 59 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनी त्यांना दहा लाख रुपये परत केले होते. उर्वरित मूळ आणि व्याजासहीत 70 लाख रुपये नंतर देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी ही रक्कम त्यांना परत केली नाही. कॉल केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्याचे मोबाईल बंद करुन पलायन केले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्र्रकार सांगून अर्पित शहा आणि मनिष मलकान यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी अर्पित आणि मनिष हे पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी शेअर ट्रेडिंगच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page