शेअरमार्केट गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेची फसवणुक

7.88 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगाने 7 कोटी 88 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. जून आणि जुलै महिन्यांत या ठगांनी चांगला परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

62 वर्षांची लिन हिल्डा वार्जिनिया ही महिला वांद्रे येथे राहत असून तिचे पती वेन डिलिमा हे व्यवसायाने बिल्डर आहेत. जून महिन्यांत लिन या त्यांच्या घरी होत्या. व्हॉटअप रुटीन मॅसेज पाहत असताना तिला प्रिया शर्मा नावाच्या एका महिलेचा मॅसेज आला होता. त्यात शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत काही माहिती देण्यात आली होती. या मॅसेजमध्ये तिने ती सुरेश मल्होत्रा यांची सहाय्यक असून त्यांना शेअरमार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास इच्छा आहे. या गुतवणुकीवर त्यांना परतावा मिळवून देण्याचे तिने तिला आमिष दाखविले होते. काही वेळानंतर तिने तिला एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करताच तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले होते. त्यात शेअरमार्केटमधील गुंतवणुकीसह नियमित शेअरबाबत माहिती प्रसिद्ध केली जात होती. कोणी किती रुपये शेअरमध्ये गुंतवणुक केली, या गुंतवणुकीवर त्यांना किती रुपये फायदा झाला याबाबत आकडेवारीसह माहिती दिली जात होती.

दुसर्‍या दिवशी तिने तिला सुमन गुप्ता या महिलेचा मोबाईल क्रमांक शेअर करुन ती तिला शेअरबाबत योग्य माहिती देईल असे सांगितले. त्यामुळे तिने सुमनला कॉल केला असता तिने तिला अ‍ॅप ओपन करण्याचा सल्ला दिला. त्यात तिने तिचा मोबाईल क्रमांक पॅनकार्डसह बँक खात्याची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर व्हॉटअप ग्रुपवर शेअरसंदर्भातील येणार्‍या माहितीची शहानिशा करुन तिने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती.

अशा प्रकारे जून ते जुलै 2025 या दोन महिन्यांत लिन वर्जिनिया हिने विविध शेअरमध्ये 7 कोटी 88 लाख 87 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर तिला प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिने सुमन आणि प्रियाला कॉल करुन याबाबतची माहिती विचारली होती. यावेळी त्यांनी तिला आणखीन रक्कम शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मात्र तिने आणखीन गुंतवणुक करण्यास नकार दिला, तसेच गुंतवणुक रक्कम विड्रॉल करण्यासाठी अ‍ॅपमधून रिक्वेस्ट पाठविली होती. यावेळी तिला तिची रक्कम परत मिळविण्यासाठी त्यांनी दहा टक्के रक्कम भरण्यास सांगितले.

तिने ही रक्कम भरण्यास नकार देत संबंधित कंपनीची शहानिशा केली होती. यावेळी तिला ती कंपनी बोगस असल्याचे तसेच या कंपनीकडून अशाच प्रकारे इतर काही लोकांना शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातण्यात आल्याचे समजले होते. त्यानंतर तिने सायबर हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जून आणि जुलै 2025 या कालावधीत निल वार्जिनिया यांनी विविध बँक खात्यात 7 कोटी 88 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यामुळे या सर्व बँक खात्याची माहिती काढून संबंधित सायबर ठगांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page