कामाच्या पहिल्या दिवशी डॉक्टरशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न
हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणे महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२४
मुंबई, – अपघात विभागात कर्तव्य बजाविणार्या एका वरिष्ठ डॉक्टरशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आजम सलीम सय्यद या ३५ वर्षांच्या आरोपीस गोवंडी पोलिसांनी अटक केली. हॉस्पिटलमधील गोंधळामुळे तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आरोपीविरुद्ध कारवाई केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे तक्रारदार डॉक्टरच्या शताब्दी हॉस्पिटलमधील कामाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.
ही घटना गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये घडली. सिंहल हेमराज गणवीर हे डॉक्टर असून उल्हासनगर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. पूर्वी ते मुलुंडच्या एम. टी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये कामाला होते. १७ जुलैला त्यांची गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये बदली झाली होती. बुधवारी १७ जुलैला त्यांचा शताब्दी हॉस्पिटलचा कामाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे ते सकाळी साडेनऊ वाजता हॉस्पिटलमध्ये हजर झाले होते. यावेळी त्यांना एसएमओ डॉ. जयंत चिलकुंड यांनी अपघात विभागात काम करण्यास सांगितले होते. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. आजीनाथ आंधळे हे त्यांचे सहकारी डॉक्टर म्हणून ड्युटीवर होते. दुपारी पावणेचार वाजता तिथे चार लोक एका जखमी महिलेला उपचारासाठी घेऊन आले होते. यावेळी तिथे महिलेच्या नातेवाईकासह मित्रांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना पेशंटकडे एकाने थांबा आणि इतरांनी बाहेर निघून जा असे सांगितले. यावेळी आजम सय्यद नावाच्या एका व्यक्तीने महिलेवर उपचार करत नसल्याचा आरोप करुन त्यांना अपघात विभागातून बाहेर जाण्यास सांगून जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची सुरु झाली होती. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन घडलेला प्रकार सांगितला.
या घटनेनंतर काही वेळानंतर तिथे गोवंडी पोलिसांचे एक पथक आले होते. यावेळी पोलिसांनी तिथे गोंधळ घालून डॉक्टरांच्या कामात अडथळा आणून त्यांनाच धमकी देणार्या आजमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी सिंहल गणवीर यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आझमविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. आजम हा खाजगी कंपनीत कामाला असून मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगर, सितारामधाम चाळीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.