न्यायालयासह शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
विशेष सरकारी वकिल म्हणून युक्तिवाद करण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मार्च २०२४
मुंबई, – विशेष सत्र, मुंबई उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयासह राज्य शासनाची फसवणुक केल्याचा आरोप करुन एका बिल्डरच्या तक्रारीवरुन विशेष सरकारी वकिलासह चौघांविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात वकिल शेखर जगताप, बिल्डर शामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल, किशोर भालेराव यांच्यासह इतर आरोपींचा सहभाग आहे. विशेष सरकारी वकिल म्हणून युक्तीवाद करण्यासाठी शेखर जगताप यांनी इतर आरोपींच्या मदतीने बोगस दस्तावेज सादर केल्याचा आरोप आहे. मात्र शेखर जगताप यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. आपण ज्या खटल्यामधये हजर होतो, त्यात विशेष सरकारी वकिल म्हणून त्यांची संबंधित अधिकार्यांनीच नियुक्ती केली होती. त्यांच्या विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्तीला मान्यता देणारी पत्र कायदा व न्याय विभागाकडून देण्यात आल्याचे सांगितले.
संजय मिश्रीलाल पुनामिया हे व्यवसायाने बिल्डर असून ते मरिनड्राईव्ह येथील अलसवा कोर्ट अपार्टमेंटमध्ये राहतात. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील, बिल्डर शामसुंदर अग्रवाल यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध खंडणीसाठी शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा तपास वांद्रे येथील गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यातआला होता. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरु असून स्थानिक न्यायालयात त्याची सुनावणी सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यातआले आहे. मरिनड्राईव्ह येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांत त्यांना नंतर पोलिसांनी अटक केली होती. सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या अटकेनंतर शेखर जगताप हे श्यामसुंदर अग्रवाल याची बाजू मांडण्यासाठी २२ जुलै २०२१ रोजी स्थानिक न्यायालयात हजर झाले होते. दुसर्या दिवशी त्यांनी न्यायालयात एक पत्र सादर करुन त्यांची या खटल्यात सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाल्याचे सांगितले.
अशाच अन्य एका गुन्ह्यांत त्यांची सरकारी वकिल नियुक्ती झाल्याचा दावा शेखर जगताप यांनी केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी न्यायालयात सरकारी वकिल म्हणून त्यांची मांडण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या आठ सुनावणीदरम्यान त्यांनी हजेरी लावली होती. शामसुंदर अग्रवालसह इतर आरोपींना मदत करण्यासाठी शेखर जगताप यांनी अडथथे निर्माण केले होते असा आरोप संजय पुनामिया यांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन शेखर जगताप यांना विशेष सरकारी वकिल म्हणून हजर राहण्यासाठी नेमलेल्या प्रकरणाची माहिती मागितली होती. यावेळी गृहविभागाकडून ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना उत्तरात मरिनड्राईव्ह आणि गुन्हे शाखेत दाखल असलेल्या खंडणीच्या दोन गुन्ह्यांत शेखर जगताप यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर शेखर जगताप यांनी विरोध केला होता. किल्ला न्यायालयातील दोन्ही प्रकरणात त्यांची हजेरी मर्यादीत होती. मात्र विशेष सत्र न्यायालयात हजर राहून शेखर जगताप यांनी न्यायालयासह राज्य शासनाची फसवणुक केल्याचा आरोप संजय पुनामिया यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय, विशेष सत्र न्यायालय आणि ठाणे जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकिल म्हणून बोगस कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करुन संबंधित सर्व आरोपीविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शेखर जगताप, शामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल, किशोर भालेराव यांच्यासह इतरांविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी १२० बी, १७०, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ ४७४ भादवी कलमार्ंगत गुन्हा नोंदविजर अरहेऋ या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून लवकरच गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे शेखर जगताप यांनी या सर्व आरोपांचे खंडन करताना त्यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे कागदपत्रे असल्याचा दावा केला आहे.