मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या कारच्या धडकेने गंभीररीत्या जखमी झालेल्या वडाळा वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस शिपाई सुशांत मोहन मोरे यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी व्हॅगनार कारचालकाविरुद्ध शिवडी पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून पोलीस शिपायाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली होती.
हा अपघात बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी वडाळा येथील ईस्टर्न फ्रीवे नॉर्थ बॉण्ड परिसरात झाला. सुशांत मोरे हे सध्या वडाळा वाहतूक पोलीस चौकीत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. बुधवारी ते सकाळी कामावर हजर झाले होते. सायंकाळी ते ईस्टर्न फ्रीवे, रे रोड रॅम्प परिसरात कर्तव्य बजावत होते. सायंकाळी पावणेआठ वाजता एका भरवेगात जाणार्या व्हॅगनार कारने त्यांना जोरात धडक दिली होती. या अपघातात सुशांत मोरे हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
तिथे उपचार सुरु असताना बुधवारी 2 फेब्रुवारी पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा पार्थिव नंतर त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर नायगाव येथील अंत्यविधी संस्कार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या अपघाताची माहिती शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.