पित्यासह भावोजीकडून सोळा वर्षांच्या मुलीवर अत्याचार

आरोपी भावोजीला अटक तर पित्याचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 जुलै 2025
मुंबई, – पित्यासह बहिणीच्या पतीनेच एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शिवडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध शिवडी पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार व पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी भावोजीला पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या पित्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

पिडीत मुलगी ही सोळा वर्षांची असून ती सध्या शिक्षण घेते. शिवडी परिसरात ती तिच्या कुटुंबियांसोबत राहते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत ती रात्रीच्या वेळेस तिच्या घरी झोपली होती. यावेळी तिचा 45 वर्षांचा पिता तिच्या खोलीत आला आणि त्याने तिचे तोंड फडक्याने बांधन, तिचे कपडे काढले. त्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तिच्यासह तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

मार्च महिन्यांत तिच्या बहिणीच्या 35 वर्षीय पतीने घरात कोणीही नसताना तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानेही तिला हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून धमकाविले होते. या दोन्ही घटनेनंतर तिला ती तिच्या घरात सुरक्षित नसल्याचे वाटत होते. अलीकडेच तिने हा प्रकार तिच्या परिचित नातेवाईकांना सांगितला होता. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने शिवडी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता.

तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पित्यासह भावोजीविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विवधि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपी भावोजीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत आरोपी पित्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page