शिवडी येथे घरात प्रवेश करुन 42 वर्षांच्या महिलेची हत्या
तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जून 2025
मुंबई, – शिवडी येथे राहणार्या हसीना अब्दुल माजिद सय्यद या 42 वर्षांच्या महिलेची तिच्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकर्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ ते अकरा वाजता शिवडीतील जय हनुमान फिटनेस सेंटरजवळील बीडीडी इमारत क्रमांक नऊसमोर घडली. मोहम्मद सलीम अब्दुल माजिद सय्यद हे मूळचे उत्तरप्रदेशच्या गौंडाचे रहिवाशी आहेत. गेल्या अठरा वर्षांपासून ते शिवडी परिसरात राहत असून हमालीचे काम करतात. त्यांचे कुटुंबिय त्यांच्या गावी राहत असून एक बहिण त्यांच्यासोबत तर दुसरी बहिण हसीना सय्यद ही शिवडी येथे राहते. गेल्या तीन वर्षांपासून तिला दारु पिण्याचे व्यसन आहे. दारु प्यायल्यानंतर तिला कुठलेही भान राहत नाही. 20 वर्षांपूर्वी तिचे अक्रम डफालीसोबत लग्न झाले होते. मात्र कौटुंबिक वादानंतर तिने त्याला सोडून दिले होते. त्यानंतर ती देवीचंद हिरालालजी जैन या 60 वर्षांच्या वयोवृद्धासोबत राहत होती. या दोघांच्या संबंधाबाबत तिने त्याला कधीच काही सांगितले नव्हते.
बुधवारी 4 जूनला सकाळी संबंधित देवीचंद जैन हा त्याच्या घरी आला होता. त्याने तो रात्री साडेनऊ वाजता जेवण आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या घरी हसीना ही एकटीच होती. जेवण घेऊन घरी आल्यांनतर त्याला हसीनाची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसून आले. तिची काहीच हालचाल नव्हती. तिच्याकडून काही प्रतिसाद नव्हता. तिच्या डोक्यातून, नाकातून आणि पाठीतून रक्तस्त्राव होत होता. तिच्या गळ्यावर आणि गुडघ्याला जखमा होत्या. तिचे नाक आणि ओठ सुजलेले होते. एकूणच घरी एकटीच असताना हसीनावर अज्ञात व्यक्तींनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केल्याचे दिसून येत होते. त्यामुळे ते दोघेही त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी तिला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद सलीम सय्यदची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून मारेकर्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.