मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – शेजारी राहणार्या ३० वर्षांच्या तरुणाने एका पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरात आणून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शिवडी परिसरात घडली. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोतर्ंगत गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. सोमवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३० वर्षांची तक्रारदार महिला शिवडी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिला पाच वर्षांची एक मुलगी आहे. शनिवारी ही मुलगी तिच्या घरासमोरच खेळत होती. यावेळी तिच्याच शेजारी राहणार्या आरोपीने तिला त्याच्या घरी आणले आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून त्याने तिला घरी पाठवून दिले. हा प्रकार सोमवारी तिने तिच्या आईला सांगितला. या घटनेनंतर तिने रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध ६५ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ३० वर्षांच्या आरोपी तरुणाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.