2.29 कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या रॉबरीचा पर्दाफाश
मुंबई-गुजरात येथून चौघांना चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी पिस्तूलसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देत मास्टरचैन अॅण्ड ज्वेल्स कंपनीच्या दोन कर्मचार्यांना धमकावून त्यांच्याकडील 2 कोटी 29 कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांची रॉबरी करुन पळून गेलेल्या टोळीचा रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपींसह चौघांना मुंबई व गुजरातच्या अहमदाबाद शहरातून अटक करण्यात आली आहे. शामलाभाई होथीभाई रबारी, जगदीशभाई, भानाराम भगराज रबारी आणि लिलाराम नागजी देवासी अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील संपूर्ण 2067 ग्रॅम वजनाचे 2 कोटी 29 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. यातील शामलाभाई रबारी हा कंपनीचा कर्मचारी व तक्रारदार आहे. त्यानेच या संपूर्ण रॉबरीची योजना बनवून इतर तिघांच्या मदतीने हा कट यशस्वी केला होता, मात्र अवघ्या दोन दिवसांत गुन्ह्यांतील चारही आरोपींना अटक करुन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शामलाभाई रबारी हा काळाचौकी परिसरात राहतो. गेल्या दहा वर्षांपासून शामलाभाई हा मास्टरचैन अॅण्ड ज्वेल्स कंपनीत कामाला होता. पायधुनी परिसरात कंपनीचे मुख्य कार्यालय तर कॉटनग्रीन परिसरात दागिने बनविण्याचा कारखाना आहे. दागिने बनवून झाल्यानंतर कंपनीकडून ते दागिने हॉलमार्कसाठी शिवडीतील क्लॉलिटी अस्साय अॅण्ड हॉलमार्क कंपनीकडे पाठवते. शनिवारी 11 ऑक्टोंबरला कंपनीचे सुरक्षारक्षक सुरेश सिंग आणि डिलीव्हरी बॉय जोगाराम देवाशी यांनी कारखान्यातून अनुक्रमे 1388.757 व 678.367 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मुख्य कार्यालयात पाठविले होते. सोमवारी कंपनीचे मॅनेजर दिपककुमार प्रजापती यांनी शामलाभाई रबारीला कॉल करुन ते दागिने हॉलमार्कसाठी शिवडी येथे पाठविण्यास सांगितले होते. त्यामुळे शामलाभाई हा कंपनीचा डिलीव्हरी बॉय जगदीश केराभाई याच्यासोबत त्याच्या बाईकवरुन 2 कोटी 29 लाख 40 हजार रुपयांचे 2067.143 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन शिवडी येथे घेऊन जात होते.
ही बाईक झकेरिया बंदर रोडवर येताच एका बाईकस्वाराने त्यांच्या बाईकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. बाईकमधील दोघांनी त्यांच्याकडील दागिने असलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला, यावेळी शामलाभाई आणि जगदीश यांनी त्यांचा प्रतिकार करुन बॅग देण्यास नकार दिला. याच दरम्यान एका व्यक्तीने त्याच्याकडील पिस्तूलसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील बॅग घेऊन पलायन केले. या घटनेनंतर त्यांनी ही माहिती राज कोठारी यांना दिली. त्यांनी त्यांना तातडीने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शामलाभाई आणि जगदीश हे दोघेही रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला.
याप्रकरणी शामलाभाईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या रॉबरीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आठ विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने आसपासच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला होता. या फुटेजवरुन आरोपी गुजरातला पळून गेल्याचे उघडकीस आले होते.
या फुटेजनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे, पोलीस निरीक्षक संजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे, महेश मोहिते, शिवाजी मदने, प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमीत कदम, किरण नवले, माधवेंद्र येवले, सुनिल पाटील, किरण भोसले, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे, उपनिरीक्षक खरात, प्रविण पाटील, एटीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे, गणेश होळकर, उपनिरीक्षक अविनाश ढेरे, पोलीस हवालदार गोविंद ठोके व इतर पोलिसांचे एक पथक गुजरातला पाठविण्यात आले होते. या पथकाने अहमदाबाद येथून लिलाराम आणि भानाराम या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी शामलाभाई आणि जगदीश यांच्या मदतीने ही रॉबरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांच्या चौकशीनंतर शामलाभाई आणि जगदीश या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
यातील भानाभाई पुण्यातील एका ज्वेलरी शॉपमध्ये तर लिलाराम हा अहमदाबाद येथे कामाला आहे. शामलाभाई याने संपूर्ण कटाची योजना बनविली होती. त्यानेच इतर तिघांच्या मदतीने ही रॉबरी घडवून आणली होती. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना 23 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.