सुरक्षारक्षकावर हल्ला करुन 48 लाखांचे दागिने पळविले
शिवडीतील बुसा इंडस्ट्रियल इस्टेटच्या कारखान्यातील घटनेने खळबळ
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पार्सल देण्याचा बहाणा करुन कारखान्यातील सुरक्षारक्षकावर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन तीनजणांच्या एका टोळीने कारखान्यातील सुमारे 48 लाखांचे 400 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केल्याची घटना शिवडीतील बुसा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडली. या घटनेने इंडस्ट्रियल इस्टेटमधील व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा दाखल करुन सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.
रोहितकुमार महेंद्रकुमार शर्मा हा मूळचा उत्तरप्रदेशच्या कानपूरचा रहिवाशी असून सध्या शिवडी परिसरात राहतो. गेल्या काही महिन्यापासून तो शिवडीतील बुसा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. मंगळवारी 21 ऑक्टोंबरला त्याचे मालक प्रदीप दिनेश शर्मा व त्यांचे मित्र कारखान्यात दिवाळीनिमित्त पूजेसाठी आले होते. रात्री साडेआठ वाजता ते सर्वजण निघून गेले. त्यामुळे त्यांनी कारखान्याचा मेन दरवाजा बंद केला होता. काही वेळानंतर तो कारखान्यातील पोटमाळ्यावर झोपण्यासाठी गेला होता.
रात्री सव्वादहा वाजता त्याला कारखान्याच्या मुख्य दरवाज्यावर कोणीतरी ठोठावत असल्याचे सिनू आले. त्यामुळे त्याने दरवाज्याच्या छोट्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. यावेळी त्याला एक टी-शर्ट घातलेला तरुण दिसला. तुमचा पार्सल आला आहे असे सांगून त्याने दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यामुळे त्याने दरवाजा उघडला. काही कळण्यापूर्वी तिथे इतर दोनजण आले. या तिघांनी आत प्रवेश करुन त्याला घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यातील एकाने सुर्याने त्याच्यावर वार केले होते. त्यानंतर ते सर्वजण कारखान्यातील कार्यालयात पूजेसाठी मांडलेल्या टेबलाच्या ड्रॉव्हरमधील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. त्यांनी त्यांचा पाठलाग करुन मदतीसाठी आरडाओरड केला होता.
हा प्रकार स्थानिक रहिवाशांना निदर्शनास येताच त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. या माहितीनंतर आरएके मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. चोरट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रोहितकुमार शर्माला नंतर पोलिसांनी तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोचार करुन त्याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी त्याचा मालक प्रदीप शर्मा यांची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीतून चोरट्यांनी त्यांच्या कारखान्यात प्रवेश करुन घातक शस्त्रांचा धाक दाखवून सुमारे 48 लाखांचे 400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. याप्रकरणी रोहितकुमारच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.