55 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल
मृत्यूमागे चक्कर नसून अपघात असल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 सप्टेंबर 2025
मुंबई, – गोवंडीतील एका 55 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी दिड महिन्यानंतर आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुफरान मोहम्मद मुस्लिम शेख असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा मृत्यू चक्कर आल्याने झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र त्याचा मृत्यू रिक्षाची धडक लागल्याने झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाकीरअली मोईनुद्दीन शेख ऊर्फ सोनू या रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. शाकीरअलीने खोटी जबानी देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुफरान शेख हा गोवंडीतील बैंगनवाडी, 25/एफ/09 मध्ये राहत होता. 20 जुलैला रात्री दहा वाजता तो गोवंडी येथून धारावीला जाण्यासाठी घरातून निघाला होता. गोवंडीतील जी. एम. लिंक रोड शिवाजीनगर सिग्नलजवळ येताच त्याला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला होता. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सायन व नंतर के. जे सोमेय्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना 25 जुलैला सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना पोलिसांना गुफरानला शताब्दी हॉस्पिटलमध्ये शाकीरअली या रिक्षाचालकाने दाखल केल्याचे समजले. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बोलते केल्यानतर त्याने गुफरानला चक्कर आली नव्हती. तो रस्त्यावरुन जात असताना त्याच्याच रिक्षाने त्याला धडक दिली होती. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी त्याने डॉक्टरांना तो रस्त्यावर चक्कर आल्याने पडल्याचे सांगून त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले.
भरवेगात रिक्षा चालविण्याच्या प्रयत्नात त्याने गुफरानला जोरात धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल, या गुन्ह्यांत अटक होईल या भीतीने त्याने पोलिसांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या चौकशीतून हा अपघात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दिड महिन्यानंतर शाकीरअलीविरुद्ध हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.