मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मे 2025
मुंबई, – ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात साठा साठवून नंतर या ड्रग्जची विक्री करण्याचा प्रयत्न शिवाजीनगर पोलिसांनी हाणून पाडला. याच गुन्ह्यांत सलमान इजहार शेख या 23 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी सहा कोटी एकोणीस लाख रुपयांचा एमडीसह गांजा, कोडेन फॉस्फेटयुक्त ओनारेक्स बॉटल्सचा साठा हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत सलमानविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सलमान शेख हा गोवंडीतील बैंगणवाडी परिसरात राहत असून तो ड्रग्जचा मुख्य सप्लायर आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा ठेवण्यात आला असून या ड्रग्जची तो लवकरच विक्री करणार असल्याची माहिती परिमंडळ सहाचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे यांना मिळाली होती. ही माहिती शेअर केल्यानंतर वरिष्ठांनी संबंधित आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, राजवर्धन खेबुडे, पोलीस हवालदार पिंजारी, पोलीस शिपाई सहाने, केदार, माळवे, सानप, राऊत यांनी सलमान शेख याच्या बैंगणवाडीतील कमलारमन नगर, रजा चौक येथील राहत्या घरी छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी 3 किलो 78 ग्रॅम वजनाचा एमडी, 12 किलो गांजाचा साठा तसेच 36 नग कोडेन फॉस्फेटयुक्त ओनोरेक्स बॉटल्स, एक लाख तीस हजार रुपयांची कॅश असा 6 कोटी 19 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यांनतर सलमानला पुढील चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशीत त्याने हा साठा त्याच्या घरी लपवून नंतर त्याची विक्री करणार असल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करणार्या पोलीस पथकाने वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.