मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जानेवारी २०२४
मुंबई, – आयुष्यभर मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी आपल्या जिवाचे रान करणार्या वयोवृद्ध आई-वडिलांना त्यांच्या तिन्ही मुलांनी वार्यावर सोडून दिले आहे. त्यांचा सांभाळ करण्यास नकार देत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडीतील बैंगणवाडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी वयोवृद्ध वडिलांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी तिन्ही मुलांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अमीनुद्दीन अलीमुद्दलीन हाजी शेख, तौफिकुद्दीन अलीमुद्दलीन हाजी शेख आणि मैनुद्दीन अलीमुद्दलीन हाजी शेख अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
अलीमुद्दीन हाजी निजामुद्दीन शेख हे ७० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार असून ते त्यांच्या पत्नी रोशनबी हिच्यासोबत गोवंडीतील बैंगनवाडी, सुन्नी जामा मशिदीजवळील प्लॉट क्रमांक १४/एम/२ मध्ये राहतात. याच परिसरात त्यांचे एक शॉप असून त्यातून मिळणार्या त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. वयामुळे त्यांच्यात आता शारीरिक कष्ट करण्याची उमेद राहिली नाही. तसेच त्यांच्याकडून काहीही कामधंदा होत नाही. त्यांचे तिन्ही मुले अमीनुद्दीन, अलीमुद्दीन आणि तौफिकुद्दीन हे त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत तिथे राहतात. तरीही ते त्यांना काहीही आर्थिक मदत करत नाही. त्यांचा सांभाळ करत नाही. त्यांना जेवणही देत नाही. त्यांच्या शॉपमधून त्यांना काही रक्कम मिळते, त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असला तरी ती रक्कम फार कमी आहे.
गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या तिन्ही मुलांकडून त्यांच्यासह त्यांच्या पतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्याच घरात राहून ते तिघेही त्यांच्याशी फारकत घेऊन राहत आहे. त्यांचे पालनपोषण करत नसल्याने तक्रारदार वयोवृद्ध पती-पत्नी काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. ज्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी जिवाचे रान केले, त्यांचे पालनपोलन केले, त्यांना समाजात मानसन्मान मिळावा यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, त्याच मुलांकडून मिळणार्या वागणुकीला कंटाळून अखेर अलीमुद्दीन शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही मुलांविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीनुद्दीन, अलीमुद्दीन आणि तौफिकुद्दीन यांच्याविरुद्ध २४ ज्येष्ठ नागरिक आणि पालकांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून या तिन्ही मुलांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.