सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करुन विवाहीत प्रेयसीची बदनामी
बदनामी केल्याप्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मे 2025
मुंबई, – बोगस अकाऊंट उघडून सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करुन एका 31 वर्षांच्या विवाहीत महिलेची तिच्याच प्रियकराने बदनामी केल्याचा प्रकार गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मसकुर खुर्शीद अन्सारी या आरोपी प्रियकराविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार महिला गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये तिच्या दोन मुलीसोबत राहत असून ती एका कपड्याच्या कारखान्यात कामाला आहे. त्याआधी ती तिच्या पतीसोबत वांद्रे येथे राहत होती. 2013 साली तिचे सादिक नावाच्या एका व्यक्तीशी लग्न झाले होते. मात्र तो नशा आणि चोरी करत असल्याने तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला होता. 2022 साली तिची मसकुरशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. मात्र तो तिच्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हता. त्यामुळे तिच्या आईने तिचे दुसर्या व्यक्तीशी लग्न लावून दिले होते. त्यानंतर ती तिच्या पतीसोबत वांद्रे येथे राहू लागली.
लग्नानंतर तिने मसकुरशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यामुळे त्याने तिच्या पतीसह सासरच्या मंडळींना शिवीगाळ करुन त्यांच्यातील प्रेमाविषयी सांगितले होते. याबाबत तिने त्याला विचारणा केली असता त्याने तिला तिच्या पतीला सोडून त्याच्यासोबत येण्यासोबत राहण्याची जबदस्ती केली होती. मात्र तिने नकार देत त्याला पुन्हा कॉल करु नकोस असे सांगितले होते. यावेळी त्याने तिला ती त्याच्यासोबत आली नाहीतर तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती. या धमकीनंतर तिने मसकुरविरुद्ध खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती.
त्याचा राग आल्याने त्याने तिच्या नावाने सोशल मिडीयावर बोगस अकाऊंट उघडले होते. याच अकाऊंटवरुन तिचे फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. इतकेच नव्हे तर तिचे फोटो तिच्या पतीसह सासरच्या मंडळींना पाठविले होते. त्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींनी तिला घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर ती गोवंडी येथे तिच्या दोन्ही मुलीसोबत राहत होती. सासरच्या मंडळींनी घरातून बाहेर काढूनही मसकुर शांत झाला नाही. त्याने तिचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची मालिका सुरुच ठेवली होती. ते फोटो व्हायरल करुन तो तिची सतत बदनामी करत होता.
वारंवार समजूत काढूनही त्याच्यात काहीच सुधारणा होत नसल्याने अखेर तिने शिवाजीनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मसकुरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.