मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
मुंबई, – गोवंडीतील नवजात बाळांचा खरेदी-विक्रीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नवजात बाळाच्या माता-पित्यासह पाचजणांविरुद्ध मानवी तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. नजिमा अस्लम शेख ऊर्फ नसरीन, फातिमा मेहमूदअली, सुमया इरफान खान आणि इरफान खान अशी या चौघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या कटाचा मुख्य सूत्रधार समीर ऊर्फ नबील शेख हा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. समीरने अशाच प्रकारे अन्य काही नवजात बालकांची खरेदी-विक्री केल्याचे बोलले जाते.
मयुरी लक्ष्मीनारायण वन्नम ही महिला ठाण्यातील पोखरण रोड परिसरात राहते. तिचे पती समाजसेवक असून चालक म्हणून काम करतात. मे 2025 रोजी त्यांना समीर नावाचा एक व्यक्ती नवजात बालकाची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी समीरला कॉल करुन भेटण्याची विनंती केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांची गोवंडीतील शिवाजीनगर, लोटस जंक्शनजवळ भेट झाली होती. यावेळी त्यांनी समीरकडे एका नवजात बाळाची मागणी केली होती. त्यामोबदल्यात त्यांनी त्याला हवे तितके पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी समीरने एक महिन्यानंतर एका महिलेची डिलीव्हरी होणार असून तिचे बाळ त्यांना चार लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. आगाऊ म्हणून त्याने त्यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तो तेथून निघून गेला होता. मात्र ते दोघेही समीरच्या संपर्कात होते.
बुधवारी 6 ऑगस्टला समीरने तिला फोन करुन तिला एका पुरुष जातीचे नवजात बाळ देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यासाठी त्याने त्यांच्याकडे साडेपाच लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी साडेपाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर मयुरी व लक्ष्मीनारायण वन्नम यांनी घडलेला प्रकार शिवाजीनगर पोलिसांना सांगून समीरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा करण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, सहाय्क पोलीस निरीक्षक नवले, काळे, उपनिरीक्षक बेले, महिला पोलीस शिपाई लोखंडे, बुधे, यमगर, पाटील यांनी लोटस जंक्शनजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
काही वेळानंतर मयुरीने समीरला कॉल केला असता त्याने नसरीन नावाची महिला बाळाला घेऊन येणार असून तिला साडेपाच लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर नसरीन ही अन्य एका महिलेसोबत तिथे आली होती. तिने तिला एक नवजात बाळासह बाळाची हॉस्पिटलची फाईल दिली होती. त्यात बाळाच्या आईचे नाव सुमया खान, एस. एन हॉस्पिटल, शिवाजीनगर, गोवंडी असे नमूद होते. बाळ दिल्यानंतर त्यांनी तिच्याकडे साडेपाच लाखांची मागणी केली होती. याच दरम्यान तिथे पोलिसांनी छापा टाकून दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांचे नाव नजिमा अस्लम शेख ऊर्फ नसरीन आणि फातिमा मेहमूदअली शेख असल्याचे उघडकीस आले. त्या दोघीही गोवंडीतील रफिकनगरात राहत होत्या. नसरीनने ते बाळ सुमया या महिलेचे असून तिने ते बाळ विक्रीसाठी समीरला दिल्याचे सांगितले. या बाळाच्या खरेदी-विक्रीतून त्यांना साडेपाच लाख रुपये मिळणार होते. ही रक्कम ते सर्वजण आपसांत वाटून घेणार होते. याप्रकरणी मयुरी वन्नम हिच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध 143 (3), 143 (4), 3 (5) भारतीय न्याय सहिता, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर नजिमा शेख, फातिमा शेख या दोघींसह बाळाचे माता-पिता सुमया इरफान खान आणि इरफान खान अशा चौघांना पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर या चौघांनाही गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत समीर शेख याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांत समीर हा मुख्य आरोपी असून त्याने अशाच प्रकारे इतर काही नवजात बालकांची विक्री केल्याचे बोलले जाते. आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.