आयकर विभागाने सील केलेली कॅश सोडविण्याच्या बहाण्याने गंडा

सव्वाकोटीची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जुलै 2025
मुंबई, – आयकर विभागाने सील केलेली सुमारे 33 कोटी रुपये सोडविण्यासाठी मदत करण्याची विनंती करुन एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या महिलेला अडीच ते तीन कोटी रुपयांचा मोबदला किंवा दादर परिरातील दोन फ्लॅटपैकी एक फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून सुमारे सव्वाकोटींना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी संदीप अनंत धनावडे या भामट्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप हा तक्रारदार महिलेच्या बालपणीच्या मैत्रिणीचा सख्खा भाऊ असून त्यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याचे तपासात उघडकीस आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. संदीपने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

दिपीका जयेंद्र पाटील ही महिला चेंबूर येथे राहत ती एका खाजगी कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून कामाला आहे. तिची साधना धनावडे ऊर्फ वायदंडे ही बालपणीची मैत्रिण असून तिचा संदीप धनावडे हा भाऊ आहे. त्यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याने ते घरातील सर्वच गोष्टी एकमेकांना शेअर करत होते. तिचा पतीसोबत कौटुंबिक कारणावरुन घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने स्वतचा फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तिने संदीपला फ्लॅटबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने तिला आयकर विभागाने 33 कोटी रुपयांची कॅश सील केली आहे. ही रक्कम सोडविण्यासाठी तिने त्याला मदत करावी. त्यामोबदल्यात त्याने तिला अडीच ते तीन कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

याच संदर्भात त्यांची मार्च 2019 रोजी दादरच्या शिवाजीपार्क येथील एका हाटेलमध्ये भेट झाली होती. यावेळी संदीपने तो वांद्रे येथील बीकेसी परिसरातील टाटा कन्सल्टन्टसीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतो. त्याला पाच ते सहा लाख रुपये पगार आहे. तिने आयकर विभागातील सिल केलेली कॅश सोडविण्यासाठी त्याला मदत केल्यास तो तिला दादर आणि शिवाजी पार्क परिसरात दोन फ्लॅटपैकी एक फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला दोन्ही फ्लॅटचे कागदपत्रे दाखवले होते. या दोन्ही फ्लॅटची किंमत पाच कोटी रुपये होती. त्यापैकी एक फ्लॅट तिच्या नावावर करण्याचे संदीपने तिला आश्वासन दिले होते.

तो तिच्या मैत्रिणीचा भाऊ तसेच त्यांच्या कौटुंबिक संबंध असल्याने तिने त्याल आर्थिक मदत करण्याचे ठरविले होते. त्यासाठी तिने तिच्या परिचितासह काही फायनान्स व पतपेढीतून कर्ज घेतले होते. तसेच तिच्याकडे सत्तर तोळे सोने होते. त्याची विक्री करुन तिला 49 लाख रुपये मिळाले होते. मार्च 2019 ते जुलै 2021 या कालावधीत त्याने संदीपला टप्याटप्याने सुमारे सव्वाकोटी रुपये दिले होते. त्यापैकी 76 लाख रुपये त्याला ऑनलाईन त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले तर 49 लाख रुपये कॅश स्वरुपात देण्यात आले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिला अडीच ते तीन कोटी रुपये परत केले नाही. त्याच्या दादर आणि शिवाजी पार्क परिसरात असलेल्या दोन फ्लॅटपैकी एक फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. वारंवार विचारणा करुनही तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. आयकर विभागाने सील रक्कम सोडविण्याचे आमिष दाखवून त्याने तिच्याकडून घेतलेल्या सुमारे सव्वाकोटीचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. या घटनेनंतर तिने शिवाजी पार्क पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संदीप धनावडे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page