स्वस्तात शॉप देण्याच्या आमिषाने 38 लाखांची फसवणुक
बोरिवलीतील बिल्डरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 ऑगस्ट 2025
मुंबई, – स्वस्तात शॉप देण्याच्या आमिष दाखवून एका शेअर ट्रेडिंग व्यावसायिकाची त्यांच्याच परिचित बिल्डरने सुमारे 38 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अरविंद परशुराम परब या बिल्डरविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जितेश बनवारी भार्गव हे 43 वर्षांचे अंधेरीतील रहिवाशी असून त्यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. अरविंद परब हा त्यांच्या वडिलांचा मित्र असून तो व्यवसायाने बिल्डर आहे. त्याची ए पी डेव्हल्पर्स नावाची एक कंपनी असून दादरच्या सेनापती बापट मार्ग, लक्ष्मी कमर्शियल शॉपिंगमध्ये कंपनीचे कार्यालय होते. एप्रिल 2024 रोजी जितेश हे त्यांचे वडिल बनवारी भार्गव यांच्यासोबत त्याच्या दादर येथील कार्यालयात गेले होते. चर्चेदरम्यान त्याने त्यांना बोरिवली येथे त्याच्या कंपनीच्या इमारतीचे प्रोजेक्ट सुरु आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये 40 लाखांमध्ये दोन शॉप घेण्याची विनंती केली होती. ते त्याच्या परिचित असल्याने त्यांना स्वस्तात शॉप देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून जितेश भार्गव यांनी त्याला टप्याटप्याने सुमारे 37 लाख 50 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता.
मात्र तीन महिने पूर्ण होऊन त्याचा प्रोजेक्ट सुरु झाला नव्हता. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांच्याकडून आणखीन आठ लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला आठ लाख रुपये दिले. मात्र ही रक्कम देऊनही त्याने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने दादर येथील कार्यालय विकून त्यांना त्यांची रक्कम व्याजासहीत परत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून जुनी स्टॅम्प ड्युटीसह कार्यालयातील मेन्टेनन्सबाकी असल्याचे सांगून दिड लाख रुपये घेतले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना पैसे परत केले नाही. फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना अरविंद परबने त्याचे कार्यालय श्यामसुंदर गुप्ता नावाच्या व्यक्तीला विक्री केल्याचे समजले.
याच दरम्यान त्याने त्यांना व्याजासहीत पैसे परत करतो असे सांगून 47 लाख 50 हजाराचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यामुळे जितेश भार्गव यांनी त्याला नोटीस पाठविली होती. या नोटीसनंतर अरविंदचा मुलगा देवदत्तने त्यांना दहा लाखांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वटला होता. मात्र उर्वरित पैशांसाठी तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत स्वस्तात शॉप देतो असे सांगून त्याने त्यांची सुमारे 38 लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी अरविंद परबविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.