दोन गाळ्यासाठी घेतलेल्या ५३ लाखांचा अपहार करुन फसवणुक
पिता-पूत्रासह तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२६
मुंबई, – दोन गाळ्यासाठी घेतलेल्या सुमारे ५३ लाखांचा अपहार करुन एका कापड व्यापार्याची तिघांनी सुमारे ५३ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिता-पूत्रासह तिघांविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. युसूफ वली खान, असलान खान आणि रेहान खान अशी या तिघांची नावे आहेत. त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
साकिनाका येथे राहणारे नुमान सिराज शेख हे कापड व्यापारी आहेत. याच परिसरात त्यांच्या मालकीचे अझान नावाचे गारमेंट व्यवसाय आहे. युसूफ आणि त्याचा मुलगा असलान खान हे त्याच्या परिचित असून त्यांचा तिथे चिकन शॉप आहे. या दोघांनी त्यांची रेहानशी ओळख करुन दिली होती. रेहान हा असलानचा मित्र असून त्याच्या मालकीची पिकनिक हॉटेल, जागृतीनगर मेट्रो स्टेशनजवळ दोन ते तीन मोकळी जागा असल्याचे सांगितले होते. या जागेची त्याला विक्री करायची होती, त्यामुळे त्यांनी ती जागा खरेदीसाठी तयारी दर्शविली होती. मात्र चौकशीदरम्यान त्यांना ती जागा बेकायदेशीर असल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी जागेवर गुंतवणुक करण्यास नकार दिला होता.
याच दरम्यान त्यांनी त्यांच्या मालकीचे वडाळा येथे दोन व्यावसायिक गाळा असून या गाळ्याची विक्री करायची आहे असे सांगितले होते. वडाळा येथील एमएमआरडीए कॉलनी, भक्ती पार्क परिसरात हा गाळा होता, स्वत युसूफ आणि असलान हे तिथे त्यांचा गुडलक पोल्ट्री नावाचे चिकन शॉप चालवत होते. त्यामुळे त्यांनी तिथे असलेल्या दोन गोळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात ५३ लाखांचा व्यवहार ठरला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी तिघांनाही कॅश स्वरुपात साडेतेरा लाख रुपये तर बँकेतून कर्ज काढून चाळीस लाखांचा धनादेश दिला होता. या पेमेंटनंतर त्यांच्यात गाळ्याचा खरेदी-विक्रीचा कायदेशीर रजिस्टर करार झाला होता. त्यानंतर त्यांनी भक्ती पार्कच्या ए विंगमधील एक आणि दोन क्रमांकाच्या गाळ्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना दोन्ही गाळ्यांचा ताबा सलमान बाटली आणि मरियम शेख यांनी घेतल्याचे समजले. याबाबत विचारपूस केल्यानंतर युसूफ खानने त्यानेच त्यांना पाच लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर गाळे दिल्याचे सांगून त्यांना लवकरच गाळ्याचा ताबा मिळेल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी गाळ्यांचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना प्रतिसाद देत नव्हते. नंतर त्यांनी त्यांचा कॉल घेणे बंद केले होते. या तिघांनी गाळ्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन गाळ्याचा ताबा न देता त्यांची ५३ लाख ५० हजाराची फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन गाळ्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी ५३ लाख ५० हजार रुपये परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर युसूफ खान, त्याचा मुलगा असलान खान आणि मित्र रेहान खान या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.