बोगस कागदपत्रांवरुन घेतलेल्या सिमकार्डची चढ्या भावात विक्री

मानखुर्द येथून आरोपीस विविध कंपनीच्या सिमकार्डसह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मे 2025
मुंबई, – बोगस कागदपत्रांवरुन घेतलेल्या सिमकार्डची चढ्या भावात विक्री करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला मानखुर्द येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. युसूफअली अब्दुल आयुब सय्यद असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे सिमकार्डचा साठा जप्त केला आहे. पाचशे रुपयांमध्ये तो एका सिमकार्डची विक्री करत असून त्याने आतापर्यंत अनेकांना अशा प्रकारे सिमकार्डची विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

अ‍ॅण्टॉप हिल परिसरात युसूफअली नावाचा एक व्यक्ती राहत असून तो बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड प्राप्त करुन चढ्या भावाने अनेकांना सिमकार्डची विक्री करत असल्याची माहिती पोलीस हवालदार किरण परब यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून त्याची शहानिशा करण्यासाठी युसूफअलीला संपर्क साधला होता. या बोगस ग्राहकाने त्याला संपर्क साधून त्याच्याकडे कागदपत्रांशिवाय सिमकार्डची मागणी केली होती. यावेळी त्याने सिमकार्ड देण्याची तयारी दर्शवून त्याच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली होती. त्याने होकार देताच त्याने त्यालाद मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, प्रशांत गावडे, पोलीस हवालदार किरण परब, पोलीस शिपाई हरड, डेरे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी युसूफअली तिथे आला आणि त्याने बोगस ग्राहकाला एक सिमकार्ड देऊन त्याच्याकडून पाचशे रुपये घेतले होते.

यावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी युसूफअलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत युसूफअली हा अ‍ॅण्टॉप हिल येथील एस. पी रोड, दिनबंधूनगर, सॉल्ट नगर परिसरात राहतो. त्याच्याकडे पोलिसांना एक बॅग सापडली, या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात विआन कंपनीचे 122 सिमकार्ड असलेले पाकिट, जिओ कंपनीचे 30, विआन कंपनीचे पाच सिमकार्ड, एक एसीएल कंपनीचे थम्स स्कॅनर, आधारकार्ड, पॅनकार्ड, एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेले पॅकेट आदी मुद्देमाल सापडला. त्याच्याकडून एक मोबाईल आणि अन्य दोन सिमकार्डही पोलिसांनी जप्त केले आहे. चौकशीत युसूफ हा बोगस कागदपत्रे सादर करुन विविध कंपनीचे सिमकार्ड प्राप्त करत होता. सिमकार्ड घेण्यासाठी आलेल्या इसमांकडून डोळे मोबाईल अ‍ॅपद्वारे स्कॅन करुन त्यांच्याकडून त्यांच्या नावाने जादा सिमकार्ड नोंदणी करत होता. कुठल्याही वैध केवायसी कागदपत्राशिवाय याच सिमकार्ड तो अनेकांना पाचशे रुपयांना विक्री करत होता. त्याने अशाच प्रकारे अनेक सिमकार्डची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अशा प्रकारे सिमकार्ड विक्री करणारा तो सराईत गुन्हेगार असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने विक्री केलेल्या सिमकार्डचा कुठल्या गंभीर गुन्ह्यांत, दशहतवादी कारवायांमध्ये वापर झाला आहे का, याकामी त्याला इतर कोणी मदत केली आहे का, त्याने आतापर्यंत किती सिमकार्डची विक्री केली आहे, ते सिमकार्ड कोणाला विकले आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page