सिमकार्ड विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना अटक

गुन्हे शाखेची कारवाई; ४४१ सिमकार्ड हस्तगत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२४
मुंबई, – गुजरातहून मुंबई शहरात सिमकार्ड विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. भावेश कमरशी गोठी आणि भरत रमेशभाई सुथार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गुजरातच्या कच्छचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ४४१ विविध कंपनीचे सिमकार्ड जप्त केले आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवून त्या सिमकार्ड विक्री करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर या टोळीची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. ही माहिती काढत असताना वांद्रे येथे काहीजण बोगस सिमकार्ड विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने शनिवारी वांद्रे येथील लालमिट्टी झोपडपट्टीजवळील वांद्रे रिक्लमेशन फ्लायओव्हरसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे भावेश गोठी आणि भरत सुथार हे दोघेही आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना भावेशकडे ३११ तर भरतकडे १३० विविध कंपन्यांचे बोगस सिमकार्ड सापडले. या दोघांनीही त्या सिमकार्डची विक्रीसाठी ते दोघेही गुजरात येथून मुंबईत आले होते. ते दोघेही गुजरातच्या कच्छ, बच्छावचे रहिवाशी आहेत. भावेशचा स्टेशनरीचा व्यवसाय असून तो दहिसर येथील रावळपाडा, गणेशनगर परिसरात राहतो. भरत हा सिमकार्ड रिटेलर असून तो अंधेरीतील जुहू गल्ली, तारकंद बेकरीजवळ राहतो.

या दोघांविरुद्ध राकेश कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी ३१८ (२), ३१८ (४), ३३६ (१), ३३६ (२), (३), ३४० (१), ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम भारतीय टेलिग्राफ कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर भरत आणि भावेश यांना रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त केलेले सिमकार्ड त्यांनी कशा प्रकारे मिळविले, ते सिमकार्ड कोणाला देणार होते. त्यांचे कुठल्या संघटित टोळीशी संबंधित आहे का, त्यांनी यापूर्वीही बोगस सिमकार्डची विक्री केली आहे, या सिमकार्डच्या माध्यमातून कुठला गुन्हा घडला आहे का, त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, या सिमकार्डचा देशविघातक कृत्यासाठी वापर होणार होता का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page