मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विरुद्ध दिशेने बाईक चालवून समोरुन येणार्या एका बाईकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सायन परिसरात घडली. अपघातात अनिमेश अविनाश मोरे या २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला असून तो विक्रोळीतील टागोरनगरचा रहिवाशी आहे. जखमींमध्ये विघ्नेश रविंद्र सरवदे, अमोल गणेश कुंचीकुर्वे, मेहंदी शहेनशाह सय्यद आणि अशफाक अस्लम अन्सारी यांचा समावेश आहे. या चौघांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. याप्रकरणी विरुद्ध दिशेने बाईक चालवून एका तरुणाच्या मत्यूस तर इतर चौघांना जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाईकस्वाराविरुद्ध सायन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात बुधवारी पहाटे पावणेचार वाजता सायन येथील सायन सर्कल ब्रिज, शिवरजनी इमारतीसमोरील उत्तरवाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विघ्नेश सरवदे, अनिमेश मोरे आणि अमोल कुंचीकुर्वे हे तिघेही विक्रोळीतील टागोरनगरचे रहिवाशी आहेत. बुधवारी पहाटे विघ्नेश हा गणपती विसर्जनासाठी त्याच्या मित्रांसोबत त्याच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन जात होता. ही बाईक पहाटे पावणेचार वाजता शिव रजनी इमारतीसमोरील उत्तर वाहिनीवरुन विरुद्ध दिशेने जात होती. यावेळी विघ्नेशने समोरुन येणार्या एका बाईकला जोरात धडक दिली. या अपघातात दोन्ही बाईकवरुन प्रवास करणारे पाचजण गंभीररीत्या जखमी झाले होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी अपघातात जखमी झालेल्या पाचजणांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे अनिमेश मोरे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर चौघांवर उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये अशफाक आणि मेहंदी हे दोघेही गोवंडीतील रहिवाशी असून अपघाताच्या वेळेस ते दोघेही त्यांच्या बाईकवरुन गोवंडीला त्यांच्या घरी जात होते. रात्री उशिरा आरोपी बाईकस्वाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.