कारला ओव्हरटेक करताना ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

हलगर्जीपणा बाईक चालविणार्‍या मृत तरुणाविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२४
मुंबई, – भरवेगात बाईक चालविताना एका कारला ओव्हरटेक करताना समोरुन येणार्‍या ट्रकच्या धडकेने विरमणी गणेश आदिद्रविड या २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर सात दिवसांनी सायन पोलिसांनी विरमणीविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातात सतरा वर्षांचा सर्वेश गणेश बहादूर हा जखमी झाला होता, त्याच्याच जबानीतून हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्वेश बहादूर हा सातरा वर्षांचा तरुण मानखुर्द येथे राहतो. २ जानवेारीला त्याचा मित्र मोईन शहा याचा वाढदिवस होता. त्यामुळे तो त्याचा मित्र विरमणीसोबत त्याच्या बाईकवरुन माहीम येथे गेले होते. पहाटे चार वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर तो विरमणीसोबत बाईकवरुन माहीम येथून मानखुर्दच्या जाण्यासाठी निघाले होते. ही बाईक सायन ब्रिजवर येताच विरमणीने एका कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात समोरुन एक ट्रक येताना दिसल्याने त्याने जोरात ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने ट्रकला जोरात समोरुन धडक दिली होती. या अपघातात सर्वेश व विरमणी हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्याला डोक्याला गंभीर तर सर्वेशच्या पायाला, पाठीला, डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही पोलिसांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे विरमणी याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर सर्वेशवर उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी विरमणीविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून, ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्‍या एका ट्रकला धडक देऊन स्वतच्या मृत्यूस तर अल्पवयीन मित्राला दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

विरमणीचा अपघातात मृत्यू झाल्याचा याबाबत एक अहवाल वरिष्ठांसह लोकल कोर्टात सादर केला जाणार आहे. विरमणी हा विरमणी हा मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारतीच्या बी/सातमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page