अज्ञात वाहनाच्या धडकेने 21 वर्षांच्या कॉलेज तरुणाचा मृत्यू
अपघातानंतर वाहनचालकाचे घटनास्थळाहून पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या अज्ञात वाहनाच्या धडकेने मयुर किशोर राय या 21 वर्षांच्या कॉलेज तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहनचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. मयुरच्या अपघाती निधनाने स्थानिक रहिवाशांसह त्याच्या रुईया कॉलेजमधील मित्रांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
हा अपघात शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजता सायन येथील डॉ. बी. ए रोड, सायन ब्रिजच्या चढणीजवळ झाला. सुनिता किशोर राय ही महिला सोशल वर्कर असून ती मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड परिसरात राहते. तिचे दोन्ही मुली खाजगी कंपनीत कामाला आहे तर मुलगा मयूर हा शिक्षण घेतो. सध्या तो माटुंगा येथील रुईया कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत होता. अनेकदा तो कॉलेजला तिच्या मुलीची केटीएम अॅक्टिव्हा घेऊन जात होता.
शनिवारी सकाळी सात वाजता तो नेहमीप्रमाणे अॅक्टिव्हा घेऊन कॉलेलला गेला होता. सायंकाळी साडेसहा वाजता सुनिता रायने त्याला कॉल केला होता, यावेळी तो बाईकवर असल्याचे सांगून घरी येत असल्याचे सांगितले होते. रात्री सव्वाआठ वाजता एका अज्ञात व्यक्तीने तिला फोन करुन तिच्या मुलाच्या अॅक्टिव्हाचा सायन ब्रिजवर अपघात झाला आहे. त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सुनिता ही तिच्या दोन्ही मुलीसोबत सायन हॉस्पिटलमध्ये गेली होती.
रात्री नऊ वाजता तिला मयुरला डॉक्टरला मृत घोषित केल्याचे सांगितले. अपघतााची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात मयूर हा त्याच्या अॅक्टिव्हा बाईकवरुन जात असताना हा अपघात झाला होता. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक तेथून पळून गेला होता. जखमी झालेल्या मयुरला एका टेम्पोच्या मदतीने सायन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
याप्रकरणी सुनिता राय हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून तिच्या 21 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघताानंतर चालक जखमी मयूरला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती न देता पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.