फॉरेन्सिक लॅबच्या निवृत्त उपसंचालक महिलेची फसवणुक
योनो अॅप अॅक्टिव्हच्या बहाण्याने तेरा लाखांना गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – ठाण्याच्या फॉरेन्सिक लॅबमधून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध उपसंचालक महिलेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे तेरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एसबीआय बँकेचा योनो अॅप अॅक्टिव्ह करुन देतो असे सांगून या ठगाने ही फसवणुक केली. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
हेंमतिनी अरविंद देशपांडे ही 62 वर्षांची वयोवृद्ध महिला सायन परिसरात राहते. ती फॉरेन्सिक लॅब विभागातून उपसंचालक म्हणून निवृत्त झाली आहे. तिचे तिच्या बहिणीसोबत दोन बँकेत पाच वेगवेगळे बचत खाते आहेत. रविवारी एसबीआय सायन शाखेची बँक सुरु आहे की नाही यासाठी तिने 9 मार्चला तिने बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला होता. मात्र तिला कोणीच प्रतिसाद दिला नव्हता. काही वेळानंतर तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो एसबीआय बँकेच्या बँकिंग सर्व्हिस सेंटमधून बोलत असल्याचे सांगून तिला टोल फ्रीवर कॉल केल्याबाबत विचारले होते.
यावेळी तिने होकार देत बँक रविवारी सुरु आहे का याबाबत विचारणा केली होती. त्याने तिला रविवारी बँक बंद आहे, तुम्ही योनो अॅपवरुन पेमेंट करु शकता असे सांगून तिला योनो अॅप अॅक्टिव्ह करुन देतो असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला योनो अॅपची एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्याने तिला विविध फिर्चस अॅक्टिव्ह करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे तो सांगत होता, तशी माहिती अपलोड केली होती. दुसर्या दिवशी तिच्या मोबाईलवर बँकेचे काही मॅसेज आले होते. त्यात तिच्या बँक खात्यातून सहा ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले.
या व्यवहारातून तिच्या खात्यातून 13 हजार 40 हजार रुपये डेबीट झाले होते. अॅप अॅक्टिव्हच्या नावाने अज्ञात सायबर ठगाने तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने सायबर हेल्पलाईनसह मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.