हॉस्पिटलच्या आवारात कारच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
अपघातप्रकरणी सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मे २०२४
मुंबई, – रुटीन चेकअपनंतर घरी जाणार्या एका ६० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला हॉस्पिटलच्या आवारात डॉक्टरच्या कारने धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात रुबेदा शेख या वयोवृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीसीटिव्ही फुटेजवरुन हा अपघात असल्याचे उघडकीस येताच आरोपी डॉक्टरविरुद्ध सायन पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत शनिवारी रात्री डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
शुक्रवारी रात्री अकरा वाजता सायन हॉस्पिटलच्या गेट क्रमांक सात, ओपीडी इमारतीजवळ एक वयोवृद्ध महिला बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ती व्हेटींलेटरवर असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला तिची ओळख पटली नव्हती. मात्र तिची ओळख पटल्यानंतर तिच्या नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर महिलेचा मुलगा शाहनवाज शेख याने मृत महिला त्याची आई रुबेदा शेख असल्याचे सांगितले. रुबेदा ही मुंब्रा येथे राहत होती. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी असल्याने तिला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते.
गेल्याच आठवड्यात तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी ती रुटीन चेकअपसाठी सायन हॉस्पिटलमध्ये आली होती. उपचारानंतर ती घरी जात होती. यावेळी सायंकाळी पावणेआठ वाजता तिला एका कारने धडक दिली होती. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार दिसून आला होता. या कारचा क्रमांक पोलिसांना नंतर प्राप्त झाला. ही कार सायन हॉस्पिटलच्या एका डॉक्टरच्या मालकीची होती. त्यामुळे शहानवाज शेख याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरुद्ध ३०४ अ, ३३८, २७९, २०३, १७७ भादवी सहकलम १८४ मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांच्या कारने या महिलेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.