सामान शिफ्ट करताना दागिन्यांची चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश
पॅकर्स अॅण्ड मूव्हर्सच्या पाचजणांना चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सामान शिफ्ट करताना सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणार्या एका टोळीचा सायन आणि काळाचौकी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण पॅकर्स अॅण्ड मूव्हर्स कंपनीचे कर्मचारी आहेत. त्यांच्या अटकेने सायन आणि काळाचौकी पोलीस ठाण्यातील दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही गुन्ह्यांतील अकरा लाखांचा चाळीस हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
श्रद्धा धर्मेश मेहता ही सायन येथे राहत सून तिच्या पतीचा काळबादेवी परिसरात कपड्याचा व्यवसाय होता. तिचा मुलगा कॅनडा तर मुलगी ऑस्ट्रेलिया येथे राहते. त्यांचा भाड्याचा फ्लॅट मालकांना विक्री करायचा होता, त्यामुळे त्याने त्यांना फ्लॅट खाली करण्यास सांगितला होता. त्यामुळे तिने सायन येथे दुसरा फ्लॅट भाड्याने घेतला होता. घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी तिने पॅकर्स अॅण्ड मूव्हर्सला संपर्क साधला होता. 9 ऑक्टोंबरला त्यांच्या घरी काही कर्मचारी आले होते, त्यांनी पॅकर्स अॅण्ड मूव्हर्सचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन त्यांचे सर्व सामान बॉक्समध्ये पॅक केले होते. या सामानात तिच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी नवीन फ्लॅटमध्ये सामान शिफ्ट केले होते. मात्र सोन्याचे दागिने असलेला बाक्स घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर श्रद्धा मेहताच्या निदर्शनास येताच तिने संबंधित कर्मचार्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही. या घटनेनंतर तिने सायन पोलिसांत संबंधित कर्मचार्यांनी आठ लाख ऐंशी हजाराचे दागिने चोरी केल्याची तक्रार केली होती.
ही घटना ताजी असताना अशीच दुसरी घटना काळाचौकी परिसरात घडली होती. रेखा अनिल बेडसा ही महिला काळाचौकी येथे राहते. त्यापूर्वी ती तिच्या कुटुंबियांसोबत लालबाग परिसरात राहत होती. हा फ्लॅट विक्री केल्यानंतर ते काळाचौकी येथे शिफ्ट झाले होते. घरातील सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने पॅकर्स अॅण्ड मूव्हर्सच्या कर्मचार्यांनी त्यांच्या सामानापैकी तीन लाख चाळीस हजाराचे सोन्या-वांदीचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी काळाचौकी आणि सायन पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला होता. या दोन्ही घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन आरोपींची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु केली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पलंगे, शैलेद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, अनंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत भोसले, पोलीस शिपाई गोपाळ चव्हाण, पराग शिंदे, खांडेकर, विजय सोनावणे (सायन पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे, भोसले, शिवतरे, पोलीस हवालदार मोरे, जाधव, पोलीस पिाई पाटील, (काळाचौकी पोलीस ठाणे), पोलीस हवालदार गोविंदा ठोके (तांत्रिक मदत) यांनी या कटातील मुख्य आरोपी संदीप विश्वकर्मा याच्यासह प्रविण पांडे, दुर्गेश मिश्रा, राकेश यादव आणि पिंटू सिंग या पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. चौकशीत त्यांनी या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. सायनच्या गुन्ह्यांतील आठ लाखांचा तर काळाचौकी गुन्ह्यांतील शंभर टक्के म्हणजे तीन लाख चाळीस हजार रुपयांचा चोरीचे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.