मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अंधारासह जास्त वर्दळ नसल्याचा फायदा घेऊन एका ३४ वर्षांच्या महिलेला मागून मिठी मारुन एका व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार कुर्ला परिसरात घडला. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच गणेश रामदास प्रसाद या ४१ वर्षांच्या आरोपीस कुर्ला पोलिसांनी अटक केली. गणेश हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून अटकेनंतर त्याला बुधवारी कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
३४ वर्षांची तक्रारदार महिला ही वांद्रे येथे राहत असून तिचे पती मंत्रालयात क्लार्क म्हणून काम करतात. मंगळवारी ती तिच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गोवंडीला गेली होती. मैत्रिणीला भेटून ती तिच्या मावस भावाच्या वाढदिवसासाठी धारावी येथे जात होती. रात्री साडेआठ वाजता गोवंडी येथून चुन्नाभट्टी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर ती स्कायवॉकवरुन एलबीएस रोडच्या दिशेने पायी जात होती. यावेळी स्कायवॉकवर अंधार होता, जास्त वर्दळ नव्हती. याच संधीचा फायदा घेऊन एका अज्ञात व्यक्तीने तु माझी बायको आहेस असे सांगून तिला जोरात मिठी मारली होती. त्याने तिचा हात जोरात पकडला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरड सुरु केला. यावेळी स्कायवॉकवरुन जाणार्या लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच तिथे काही वेळानंतर कुर्ला पोलिसांनी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले.
या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचे नाव गणेश प्रसाद असल्याचे उघडकीस आले. गणेश हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या खार परिसरात राहतो. तो काहीच कामधंदा करत नाही. स्कायवॉकवर तो कशासाठी आला होता, बायको म्हणून त्याने महिलेला मिठी मारुन तिचा विनयभंग केला, त्याचे कुटुंबिय कुठे राहतात याचा आता पोलीस तपास करत आहेत.