निवृत्त एसीपीच्या मुलीच्या फसवणुप्रकरणी आरोपीस अटक
लग्न, घर व गुंतवणुकीच्या आमिषाने बारा लाखांची गंडा घातल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जुलै २०२४
मुंबई, – लग्नासह घर आणि गुंतवणुकीच्या बहाण्याने मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून निवृत्त झालेल्या पोलीस अधिकार्याच्या घटस्फोटीत मुलीची सुमारे बारा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. दिनकर रमेश तळेकर असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत डॉ. कोमल पाटील, सचिन राजपूत चव्हाण, स्नेहल अग्रवाल आणि सुनिल अशी असे चौघेजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३८ वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली येथे राहत असून ती खाजगी शिकवणी घेते. २०१३ रोजी तिचे एका व्यक्तीशी लग्न झाले होते, मात्र त्यांच्यात पटत नसल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ साली त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिच्या आईचा साड्यांचा व्यवसाय आहे तर तिचे वडिल मुंबई पोलीस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. ते सर्वजण सध्या पुणे येथे राहतात. घटस्फोटानंतर तिला तिच्या पतीकडून तडजोड रक्कम म्हणून तीस लाख रुपये मिळाले होते. चार वर्षांपूर्वी तिने दुसर्या लग्नासाठी एका खाजगी लग्न जुळविणार्या संकेतस्थावर स्वतच्या नावाची नोंद केली होती. तिथेच तिची ओळख आलोक चौगुलेशी झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. काही दिवसांनी तिला डॉ. कोमल पाटील हिने फोन करुन आलोक चांगला मुलगा नसून तिने तिचा बालपणीचा मित्र सचिन राजपूतशी लग्न करावे असा सल्ला दिला होता. त्यानंतर ती सचिनच्या संपर्कात आली होती. अनेकदा चॅट आणि कॉलवर बोलताना त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. याच दरम्यान त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. लग्नानंतर आपण दादर येथे फ्लॅट घेऊ तसेच त्यांचा लोणावळा येथे वडिलोपार्जित बंगला आहे. त्याचे नूतनीकरण करु असे सांगितले होते. नवीन घर बुक करण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याला सात लाख दहा हजार रुपये दिले होते. त्यानंतर तो सतत तिच्याकडे पैशांची मागणी मागणी करत होता. तिने दिलेले पैसे परत करत नव्हता. त्यामुळे त्याने तिच्याशी संपर्क बंद केला होता.
याच दरम्यान डॉ. कोमल पाटीलने तिची समजूत काढून सचिनने घेतलेले पैसे तुला परत मिळतील असे सांगून तिची स्नेहल अग्रवालशी ओळख करुन दिली. स्नेहल ही शेअरमार्केटमध्ये काम करत होती. तिने तिला शेअरमध्ये गुंतवणुकीमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने तिच्याकडे गुंतवणुकीसाठी ३ लाख ८० हजार रुपये दिले होते. काही दिवसांनी तिला पुन्हा सचिनने कॉल करुन त्याच्या बंगल्याचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी सुनिल या इंजिनिअरला काही रक्कम द्यायची आहे. त्यामुळे तिने त्याला मदत करावी अशी विनंती केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने सुनिलच्या बँक खात्यात एक लाख नऊ हजार रुपये पाठवून दिले होते. अशा प्रकारे तिच्याकडून या चौघांनी सुमारे बारा लाख रुपये घेतले होते. मात्र वारंवार संपर्क साधूनही ते तिघेही तिला प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्याकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉ. कोमल पाटील, सचिन चव्हाण, स्नेहल अग्रवाल आणि सुनिल या चौघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता.
याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तपासात फसवणुकीची रक्कम दिनकर तळेकर याच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यामुळे त्याची माहिती काढण्यात येत होती. ही माहिती काढताना दिनकर हा बीडचा रहिवाशी असून तो त्याच्या कुटुुंबियांसोबत तिथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर समतानगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने बीड येथून दिनकर तळेकर याला अटक केली. तपासात तो सचिन राजपूतच्या संपर्कात होता. त्याच्या सांगण्यावरुन त्याने बँक खात्यात जमा झालेली रक्कम त्याला दिली होती. त्यासाठी त्याला काही रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. या गुन्ह्यांतील इतर आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत.