कांदिवलीतील वयोवृद्ध महिलेची तिघांकडून फसवणुक
नेटवर्किंग व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने पैशांचा अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कांदिवलीतील एका वयोवृद्ध महिलेची तीन भामट्यांनी सुमारे पावणेनऊ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेटवर्किंग व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने या तिघांनी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याचा आरोप आहे. मनोज विनरकर, मनिष विनरकर आणि चेतन देवकर अशी या तिघांची नावे असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या तिघांनी अशाच प्रकारे गुंतवणुकीच्या बहाण्याने इतरांना गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
६५ वर्षांची तक्रारदार वयोवृद्ध महिला मंगला शाम पार्सेकर ही कांदिवलीतील समतानगर परिसरात राहते. ती एका खाजगी बँकेतून निवृत्त झाली असून सध्या तिच्या पती आणि भावासोबत निवृत्ती आयुष्य जगत आहे. तिचा नातेवाईक प्रकाश नागावकर कांदिवलीतील चारकोप परिसरात राहतात. त्याने तिला मनोजविषयी माहिती सांगितली होती. मनोज हा हुशार, होतकरु आणि नेटवर्किंग क्षेत्रात चांगले काम करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे गुंतवणुक केल्यास तिला चांगला परतावा मिळेल असे सांगितले. काही दिवसांनी मनोजने तिला संपर्क साधून गुंतवणुकीबाबत सर्व माहिती सांगितली. डिसेंबर २०१८ रोजी मनोज हा त्याचा मित्र चेतनसोबत तिच्या घरी आला होता.
नेटवर्किंग व्यवसायासाठी किमान दहा लाखांची गुंतवणुक करावी लागेल असे त्याने सांगितले. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा आणि काही महिन्यांत गुंतवणुक रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे डिसेंबर २०१८ ते जून २०२१ या कालावधीत तिने त्याच्याकडे पावणेनऊ लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र ही रक्कम दिल्यानंतर त्याने त्याचा व्यवसाय सुरु केला नव्हता. त्यामुळे ती सतत मनोज व मनिष आणि चेतन यांना संपर्क साधून व्यवसायाबाबत विचारणा करत होती.
मात्र या तिघांकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता. या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने तिच्या पैशांची मागणी सुरु केली, पैशांची मागणी करुनही त्यांनी तिला पैसे परत केले नाही. त्यानंतर तिने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मनोज विनरकर, मनिष विनरकर आणि चेतन देवकर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.